वादळी गारपीट पावसाने झालेल्या शेत पिकांचे नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी-हिकमत उढाण
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,घनसावंगी तालुक्यातील मागील दोन दिवसांपासून अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने थैमान घातले आहे. घनसावंगी अंबड जालना तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घनसावंगी तालुक्यात सात ते आठ हेक्टर व अंबड जालना तालुक्यात कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन आर्थिक हानी झाली आहे.
गारपिटीने रब्बी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.तर वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होऊन काढणीला आलेला गहू,हरभरा,मका,ज्वारी,बाजरी, शाळू, इ. पिके भिजल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
गारपीट झाल्याने कांदा बीज गहू बाजरी मका इ रब्बी पिके हातची गेली आहेत.
गारपिटीने शेडनेट चे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गारपिट व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने जिल्हा प्रशासनामार्फत पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यास धीर देण्याची मागणी शिवसेना सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.