सद्यस्थितीत जिल्ह्यात कुठलाही लॉकडाऊन नाही-जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
जालना: नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन करा
जालना, दि. 26
सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नसुन नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता याबाबत विचारविनिमय सुरु असुन जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासोबत उद्या चर्चा करणार असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी मास्क, सॅनिटायजरचा प्रभावीपणे वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमतीवर होळी सण साजरा करत असताना प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घ्यावी. होळीच्या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करु नये.
कोरोनापासुन स्वत:सुरक्षित राहुन इतरांनाही सुरक्षित करण्याच्यादृष्टीने कोरोनासंदर्भात प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचना तसेच निर्बधांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.