बंजारा समाज होळीनिमित्त मुलांच्या बारशाला एकत्रित येवून साजरा करतात ‘धूंड’ उत्सव !
बंजारा समाजाने आजही जपली परंपरा
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
बंजारा समाजाने आजही आपली संस्कृती, परंपरा टिकवून ठेवली आहे.दरवर्षी होळी नंतर नवसाला जन्माला आलेल्या मुलाची ‘धुंड’ अर्थात बारसं संपूर्ण गाव काही जिल्ह्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी एकत्रित येऊन करते.प्रत्येक तांड्यावर आजही ही परंपरा जपली जात आहे.
घनसावंगी तालुक्यातील यावलपिंप्री तांडा,विरेगाव तांडा,जांब तांडा,भेंडाळा तांडा,घोन्सी तांडा, बोरगाव तांडा, आदी बंजारा तांड्यावर हा उत्सव साजरा होतो.होळीच्या दिवशी समाजाच्या धुंड साजरी केली जाते. तर बंजारा होळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच धूलीवंदनाच्या दिवशी सुर्योदयाच्या वेळी पेटविली जाते.त्याचे नियोजन होळीच्या दिवशी सायंकाळी बैठकीतून केली जाते.सर्व कुटुंबात नवीन कपड्यांची खरेदी केली जाते.पहाटे चारच्या सुमारास जमा केलेला जळण फाटा,गोवऱ्या एकत्रित करून विधिवत पूजेनंतर होळी दहन केली जाते.
यावेळी जेष्ठ महिला, पुरूषांमध्ये बंजारा गीतांची जुगलबंदी होते.गाण्याची ताल आणि हलगीच्या ठेक्यावर नृत्यही केले जाते.
असा असतो धूंड उत्सव
बंजारा समाजातील राठोड, पवार,आणि जाधव कुटुंबीयांत जन्मलेल्या मुलाचे बारसे होळीच्या सणानिमित्त केले जाते.होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलीवंदन असते.साधारणत: दुपारी एक वाजता मोठ्या मैदानात जमिनीत हंडा पुरला जातो.प्रारंभी मुलाला ‘चरिय.. चरिया..चंपावेळ’ या गीतातून आर्शिर्वाद दिला जातो. या हंड्यात खोबरमिश्रित खीर असते.हा हंडा काढणे हे पुरूषासाठी प्रतिष्ठेचे मानले जाते.
या हंड्याच्या सभोवताली बंजारा महिला हलगीच्या तालावर नृत्य करुन या हंड्याचे रक्षण करतात.हा हंडा घेण्यासाठी जवळ येणाऱ्या पुरूषांना हातातील काठीने पिटाळले जाते.बंजारा गाणाच्या तालावर सलग तीन तास नृत्य सुरू असते.या सर्व कला उत्सावात गेरीया (पुरुष) आणि गेरीण (महीला) यांच्या मुख्य भूमिका असतात.
गेरणीच्या काठीने मार खाऊनसुद्धा गेरिया इतर पुरुषांच्या मदतीने हंडा प्राप्त करतो.शेवटी प्रसाद म्हणून या हंड्यातील खीर संपूर्ण घराघरांत वाटला जातो.
विरेगाव तांड्यात होणार आरत चा धूंड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा,सण उत्सावर निर्बंध आहेत.त्यामुळे विरेगाव तांड्यावर अमोल राठोड यांचा मुलगा आरत याचा बारसाचा हा कौटुंबिक कार्यक्रम अगदी मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थित होणार आहे.
बंजारा समाजातील ही परंपरा कोरोनामुळे सार्वजनिक न करता कौटुंबिक पद्धतीने,नियम पाळून करीत असल्याचे अमोल राठोड यांनी सांगितले.