राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय मोबाईल मेडीकल युनिटचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण
जालना, दि. 28 (न्यूज ब्युरो) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय मोबाईल मेडीकल युनिट सर्व सोयींनीयुक्त अशा दोन व्हॅनचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लोकार्पण करण्यात आले
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अर्जुनराव खोतकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंडित भुतेकर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताव सवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, जिल्ह्यातील दुर्गम भागातील गोरगरीब ज्यांना उपचारासाठी शहरामध्ये येता येत नाही, अशांसाठी या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातुन आरोग्याच्या सेवा उपलब्ध होणार असुन या मोबाईल व्हॅनद्वारे ग्रामीण भागातील जनतेस मोफत आरोग्य सेवा, 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर माता व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा, साथजन्य परिस्थितीमध्ये तात्काळ उपचार, आरोग्य विषयक समुपदेशन व उपचार, नियमित लसीकरण तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारच्या 20 मोबाईल व्हॅन्स कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.