जिल्ह्यातील कामगारांची दर पंधरा दिवसांनी कोरोना चाचणी करा
45 वर्षावरील प्रत्येक कामगारांना कोरोना लस टोचुन घ्यावी
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आवाहन
न्यूज जालना दि. 31
जिल्ह्याच्या तुलनेत जालना शहरामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ट्रॅकींग व टेस्टींगबरोबरच लसीकरणही महत्वाचे असल्याने जालन्यातील प्रत्येक कामगारांची दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी करण्याबरोबरच 45 वर्षावरील प्रत्येक कामगाराने लस टोचुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले.
कोरोना लसीकरण तसेच चाचणीसंदर्भात व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, व्यापारी महासंघाचे घनश्याम गोयल, अशोक राठी, अविनाश देशपांडे, प्रज्ञेश केनिया आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे म्हणाले, जालना येथे मोठी औद्योगिक वसाहत असुन हजारो कामगार या ठिकाणी काम करतात. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक कामागारांची दर पंधरा दिवसाला कोरोना चाचणी अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर 1 एप्रिलपासुन 45 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस घेता येणार असल्याने 45 वर्षावरील कामागारांसाठी प्रशासनामार्फत मोफत लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कोरोना चाचणी तसेच लसीकरणासाठी प्रशासनामार्फत टीम्स गठीत केल्या असुन दि. 1 एप्रिल पासुन चाचणी तसेच लसीकरण या टिम्सच्या माध्यमातुन सुरु करण्यात येणार आहे. कामगारांना चाचणी व लसीकरणासाठी ठरविण्यात आलेल्या केंद्रावर घेऊन येण्याची जबाबदारी प्रत्येक आस्थापना मालकांनी घेण्याचे आवाहन करत अधिकाधिक चाचणी तसेच लसीकरण केल्यास कोरोनाला अटकाव करण्यास निश्चित यश येईल, असेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
कंपनीचे उत्पादन हे कामगारांवर अवलंबुन असते. कामगार स्वस्थ राहिला तरच कंपनीला अपेक्षित उत्पादन घेता येणे शक्य आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांबरोबरच औद्योगिक वसाहतीवरही मोठ्या स्वरुपात परिणाम होत प्रत्येक कामगाराने कोरोना चाचणी करुन घेण्याबरोबरच 45 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने लस टोचुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले.
जालन्यामध्ये कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सिन अशा दोन लस उपलब्ध असुन खासगी दवाखान्यांमध्ये प्रत्येक डोससाठी 250 रुपये तर शासकीय रुग्णालयात मोफत स्वरुपात लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. खासगी दवाखान्यामध्ये फिस आकारणी केली जात असल्याने त्यांच्याकडे असलेल्या लस पडुन आहेत. खासगी दवाखान्यात असलेल्या लसीचा उपयोग कामगांराना टोचण्यासाठी करण्यात येऊन त्यापोटी येणारा खर्च व्यापारी महासंघाने उचलण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.