आठ एकर ऊस जळूनही महावितरणला जाग येईना,शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात!
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रा कडून परीसरातील ४५ गावांना विद्युत पुरवठा केला जातो.
गावातील व शेत शिवारातील विद्युत पोल पूर्णपणे वाकलेले असून, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा या धोकादायक बनलेल्या आहेत.
येथील महावितरण उपकेंद्राचा हलगर्जीपणा व गलथान कारभारामुळे याच विद्युत तारेच्या घर्षणामुळे विरेगव्हाण शिवारातील पैठण डाव्या कालव्या जवळील शेतात आठ एकर ऊसाला (१४ मार्च) रोजी आग लागली होती.तसेच जांबसमर्थ येथील एका शेतकऱ्याचा तीन एकर ऊसाला तार तुटून पडल्याने दि.२२ मार्च दुपारी आग लागली होती.परीसरातील विद्युत तारा जीर्ण झाल्याने आगीची मालिका सुरूच आहे.
दरम्यान महावितरण उपकेंद्राकडून जळालेल्या ऊसाचा पंचनामा केला खरा; परंतू हे विद्युत पोल ‘जैसे थे वैसे’ च्या अवस्थेत उभा आहे.या संदर्भात महावितरणला त्वरीत जाग येत नसल्याने शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
येथील महावितरण उपकेंद्रास लेखी तक्रार व विनंती करूनही याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष केला जात आहे.
महावितरण आणखीन काही शेतकऱ्यांचा ऊस जळण्याची वाट तर पाहत नाहीत ना? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
या लोंबकळणाऱ्या विद्युत तारा व खांब त्वरीत हटविण्यात याव्यात,नसता महावितरण उपकेंद्र कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.