विरेगव्हाण तांडा येथील वळण रस्ता बनला धोकादायक !
वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
सध्या पाचोड अंबड घनसावंगी कुंभार पिंपळगाव आष्टी मार्गे पाथरी राज्य महामार्गाचे रूंदीकरणाचे काम सुरू आहे.परंतु या मार्गावरील अनेक वळणे धोकादायक असून,या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही.या रस्त्यावरून रात्रंदिवस वाहनांची नेहमीच वर्दळ असते.या महामार्गावरील वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने हा वळण रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.त्यामुळे या वळण रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होत आहे.यात काही लोकांना आपला जीव पण गमवावा लागला.
या मार्गावरील विरेगव्हाण तांडा येथे धोकादायक वळण रस्ता आहे.अनेकदा वाहन चालकास अंदाज येत नसल्याने अपघात घडतात.विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला विहिर असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.या रस्त्यावर दिशादर्शक फलक व गतिरोधक नसल्याने अनेक चालक भरधाव वाहने चालवितात यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्यावर दिशादर्शक फलक व विहिरीच्या कठडेला सरंक्षण भिंत बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.