औद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजन प्लँटला विभागीय आयुक्तांची भेट
ऑक्सिजनचा उपयोग केवळ आरोग्य विषयक बाबींसाठीच करण्याचे निर्देश
न्यूज जालना ब्यूरो दि. 16
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ऑक्सिजन प्लँटला विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट देत प्लँटची पहाणी करुन निर्मित करण्यात येणारा ऑक्सिजन केवळ आरोग्य विषयक बाबींसाठीच वापरण्याचे निर्देश यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, अन्न व औषध प्रशासनाच्या श्रीमती अंजली मिटकर, जिल्हा औद्योगिक केंद्राच्या श्रीमती खरात यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर म्हणाले, कोव्हीड बाधित रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील ऑक्सिजनचा साठा केवळ आरोग्य विषयक बाबींसाठीच राखीव ठेवण्यात यावा. ऑक्सिजन निर्माण करण्यात येत असलेल्या कंपन्यांवर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवण्याच्या सुचना करत आरोग्य विषयक बाबीव्यतिरिक्त ऑक्सिजनचा वापर आढळल्यास कठोर कारवाई करण्याच्या सुचनाही विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर यांनी यावेळी केल्या. जिल्हा प्रशासनामार्फत सील करण्यात आलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लँटला भेट देत हे प्लँट जिल्हा प्रशासनाने तातडीने ताब्यात घेऊन त्याचा उपयोग ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी वापरण्याच्या सुचनाही विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर यांनी यावेळी दिल्या.