विनाकारण फिरणाऱ्यांची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत कोरोना चाचणी;सहा जण पॉझिटिव्ह
जिल्हावासियांने कोरोनाचे गांभीर्य ओळखा : आतातरी विनाकारण रस्त्यावर न फिरता घरीच रहा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा-जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे आवाहन
न्यूज जालना, दि. 19 (न्यूज ब्युरो):- जालना जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावले असतानासुद्धा कोरोनाचे गांभीर्य न बाळगता अनेकजण रस्त्यावर फिरत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी अंबड चौफुली येथे चक्क रस्त्यावर उभे राहुन आता तरी कोरोनाचे गांभीर्य ओळखा व विनाकारण रस्त्यावर न फिरता घरीच राहुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन जिल्हावासियांना केले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, उपअधीक्षक सुधीर खीरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, पोलीस निरीक्षक श्री महाजन आदींची उपस्थिती होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत संपुर्ण राज्यामध्ये कडक निर्बंध लावले आहेत. जालना जिल्ह्यातही या निर्बंधाची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन कोरोनाची चेन तोडण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भुमिका ही महत्वाची आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेबर पडा अन्यथा घरातच राहुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन करण्याची गरज असुन कोरोनापासुन सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात १ मे पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यात विनाकारण वावरण्यावर निर्बंध असतानासुद्धा अंबड चौफुली येथे अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्याने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनी अशा व्यक्तींची अँटीजेन तपासणी करण्याचे निर्देश दिले. या तपासणीमध्ये अनेकजण कोरोना बाधित आढळले. यापुढे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची तपासणी करुन ते बाधित आढळल्यास त्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
अग्रसेनभवनमध्ये कोव्हीड केअर सेंटर
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पहाणी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत तसेच खाटांची संख्या वाढावी यादृष्टीकोनातुन जालना शहरामध्ये असलेल्या अग्रसेनभवन येथे कोव्हीड केअर सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी या ठिकाणी भेट देत निर्माण करण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची पहाणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुखही उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीमधील ऑक्सिजन प्लँटला भेट
जालना येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ऑक्सिजन प्लँटला जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी भेट देत निर्माण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनची पहाणी करण्याबरोबरच या ठिकाणाहुन रिफील करण्यात येणाऱ्या सिलेंडरचीही पहाणी त्यांनी यावेळी केली. निर्माण करण्यात येणारा ऑक्सिजन केवळ आरोग्य विषयक बाबींसाठीच दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.