कोरोना अपडेट

कोरोना काळात पाडळी – रामखेडा गट ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था

गावात निर्जंतुकीकरण मोहिमेची आवश्यकता, डासांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांना रोगराईची भीती

किशोर सिरसाट/बदनापूर
बदनापूर/प्रतिनिधी : ता.06: कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात पाडळी – रामखेडा गट ग्रामपंचायत प्रशासन कमालीची उदासीनता दाखवत आहे, त्यामुळे ग्रामस्थांत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या गावांत डासांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र भीती व्यक्त करण्यात येत असून ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत किमान गावात निर्जंतुकीकरण आणि धूर फवारणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कोरोनाचा हाहाकार माजला आहे. त्यामुळे शासन व प्रशासन युद्धपातळीवर उपयोजना राबविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देत आहे. मात्र बदनापूर तालुक्यातील पाडळी गावांत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात स्थानिक प्रशाशन उदासीनता दाखवत आहे. बदनापूर शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर असलेल्या पाडळी गावांत अद्याप कोरोनाचा फारसा उद्रेक झालेला नाही. मात्र कोरोनाची दुसरी लाट अधिक भयानक असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनीही अधिक काळजी घेत कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र पाडळी गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही उपाययोजना राबविली गेलेली नाही. कोरोनाची दुसरी लाट दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप उपाययोजने बाबत कुठलाही आराखडा तयार करण्यात आलेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांत कोरोना बाबत काहीसे दहशतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीत गावात कमालीची अस्वछता आणि दुर्गंधीचे वातावरण आहे. त्यामुळे गावात डासांची आबादी वाढलेली आहे. त्यातून ताप येण्याचे प्रमाण वाढू शकते, सध्या कोरोनातही तापेचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे ग्रामस्थांना येणारी ताप मोसमी आहे की कोरोनाची याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने महामारीच्या काळाचे भान ठेवत गावांत निर्जंतुकीकरण व धूर फवारणी करावी. शिवाय सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आणावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शक्य त्या उपाययोजना राबवाव्यात शिवाय त्यांस ग्रामस्थांनी देखील योग्य साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

images (60)
images (60)

गावामध्ये डासाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे. फवारणी करण्यात आली नसल्याने रात्रीच्या वेळेस डासांच्या झुंडी सर्वत्र वावरत आहे. त्यांच्या चाव्याने अनेकांना रात्रीची झोप घेणेही अवघड झाले आहे. गावात डासांचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आबालवृद्ध यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातून डेंग्यू, मलेरिया, सर्दी ताप, खोकला या सारखे आजार बाळावण्याची शक्यता आहे.
(तुळशीदास सिरसाठ, ग्रामस्थ पाडळी)

2 )प्रतिक्रिया
———-
गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने 2018 मध्ये जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र ही योजना सध्या बंद आहे. त्यामुळे नागरिकांना क्षारयुक्त असलेल्या नळाच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. गावात नळाद्वारे घरोघरी पाणी पोहोचते परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही. जळकुंभाची नियमित स्वच्छता झाली पाहिजे. प्रशासनाने तातडीने जलशुद्धीकरण यंत्राची दुरुस्ती करून ग्रामस्थांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा.
(सौ.सत्यशीला कृष्णा सिरसाट, माजी सरपंच )

3) प्रतिक्रिया
————
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. गावात निर्जंतुकरणाची फवारणी करणे तसेच सोशल डिस्टनसिंगचा वापर करणे व गावातील सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आणणे. तरच कोरोना सारखा महाभयंकर रोग आटोक्यात येण्यास मदत होईल. कोरोना काळात ग्रामपंचायतीने नियमित आढावा घेऊन स्थानिक पातळीवर उपक्रम राबवता येतील ते उपक्रम काटेकोरपणे राबवावेत.
( सौ.सविता अविनाश शेळके: माजी सरपंच)
——–

4) प्रतिक्रिया जलशुद्धीकरण यंत्र दुरुस्तीसाठी तातडीने प्रयत्न करण्यात येत असून येत्या दोन ते तीन दिवसांत हा प्रश्न सुटेल.
तसेच जलकुंभ हे प्रत्येक महिन्याकाठी स्वच्छता केल्या जात आहे जेणेकरून गावकऱ्यांच्या आरोग्य धोक्यात येणार नाही अशी काळजी ग्रामपंचायत प्रशासन निश्चित घेत आहे.
( बी. जी. पंजाबी, ग्रामविकास अधिकारी)
————–
5) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जनजागृती करीत आहोत. कोरोना प्रतिबंध उपयायोजनासह कोविड लसीकरण मोहीम लवकरात लवकर सुरू करणार आहोत. जलशुद्धीकरण यंत्राच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल. ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून सहकार्य करावे..
(सरपंच पाडळी : मनोरमा निकाळजे)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!