जालना :कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब ,रेल्वे पुलाखाली सापडला मूर्त्यदेह
आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह
न्यूज जालना
गुरुवार दिनांक सात रोजी एका संशयित रुग्णाने सामान्य रुग्णालयातून पलायन केले. दोन दिवसांपूर्वी देखील गायकवाड नावाच्या व्यक्तीने रुग्णालयातून पलायन केले होते आणि औरंगाबाद महामार्गावर त्याच्या दुचाकीला अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका संशयित रुग्णाने दवाखान्यातून पलायन केले. या संदर्भातील माहिती आरोग्य प्रशासनाने पोलिसांना दिल्यानंतर संबंधित संशयित कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय समोरील रेल्वे पुलाखाली सापडला
परतूर तालुक्यातील शिरसगाव येथील ज्ञानेश्वर सोपानराव माटे यांच्यावर आज दुपारी जालना येथील सामान्य रुग्णालयात संशयीत कोरोना बाधित म्हणून उपचार सुरू होते. दरम्यान ज्ञानेश्वर माटे आणि त्यांचा पंचवीस वर्षाचा मुलगा हे पूर्वी सेलू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. या दोघांनाही काल रात्री येथील सामान्य रुग्णालयात भरती केले .दरम्यान ज्ञानेश्वर माटे यांचा सिटी स्कॅन चा स्कोर बारा असल्याचे त्यांनी सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या कागदपत्रांवरून दिसते. त्यामुळे त्यांच्यावर संशयित रुग्णांवर करण्यात येणारे उपचार सुरू करण्यात आले होते .
दुपारी दीड वाजता बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू असताना ते अचानक गायब झाले. ही बाब तेथील डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच कदीम जालना पोलिसांना ही माहिती दिली .पोलिसांनी या रुग्णाचा शोध घेत असताना राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात समोरून जाणाऱ्या रेल्वे पटरी च्या पुलाखाली ज्ञानेश्वर माटे यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान मृतदेह सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर कोविड चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
रात्रीच माटे पिता-पुत्रांना या दवाखान्यात भरती करण्यात आले होते. आणि मुलगा देखील पॉझिटिव्ह असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.