धन्याच्या मृत्यूने पशुधनही हळहळले सर्जा-राजाच्या जोडीसह मोत्यानेही घेतले नाही अन्नपाणी
कोरोनाने साधला डाव,परतूर तालुक्यातील ह्रदयद्रावक घटना
वृत्त-विशेष/न्यूज जालना
परतूर – शेती,शेतकरी व पशुधनाचे नाते किती घनिष्ठ व आपुलकीचे असते याचा प्रत्यय बाबई गावात घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेने पुन्हा एकदा आला.आपले धनी तुळशीराम लोमटे यांच्या निधनाची जाणीव होताच सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत राहणाऱ्या त्यांच्या सर्जा-राजा बैलजोडीने व मोत्या या पाळीव कुत्र्याने अन्नपाणी घेतले नाही.हे हृदयस्पर्शी चित्र पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या !
घडले ते असे ——
तुळशीराम लोमटे.परतूर तालुक्यातील बाबई गावातील ८७ वर्षीय वयोवृद्ध शेतकरी.गावशिवारात त्यांची१५ एकर शेती आहे.सकाळी शेतात जायचे …दिवसभर काम करायचे…..सायंकाळी घरी परतायचे.घरी आल्यावर गावातील देवळात जायचे.हरिपाठ घ्यायचा असा त्यांचा दररोजचा दिनक्रम.
सर्जा-राजाच्या जोडीसह मोत्यासोबत त्यांचे एवढे घनिष्ठ संबंध जुळले होते की तुळशीरामजी त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानत.
उभ्या आयुष्यात त्यांनी कधी दवाखान्याचे तोंडही पाहिले नाही.माळकरी असल्याने साधी राहणी,साधा व शाकाहारी आहार हे तत्व त्यांनी जीवनभर अंगिकारले.८७ व्या वर्षीही त्यांना चष्मा लागलेला नव्हता हे विशेष.
शेती हाच त्यांचा आवडता विषय होता. बैल,गाय, कुत्रा इतर पाळीव प्राण्यांना ते जीवापाड जपत. त्यांची देखभाल करत.त्यांना वेळेवर चारापाणी देत.आजारपणात औषधोपचार करत.परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडली.अल्पावधीतच त्यांचे निधन झाले.
—————————–
कोरोनाने साधला डाव !
—————————–
२ मे पर्यंत वडिलांची तब्येत ठणठणीत होती. परंतु ३ तारखेला अचानक तब्येत बिघडली.जालन्याच्या दवाखान्यात दाखल केले.तपासणी केली असता कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.शेवटी बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.अंत्यसंस्कारही जालन्यातच झाले.
—————————–
आपले मालक का दिसत नाहीत याची जाणीव सर्जा-राजाच्या जोडीसह मोत्याला झाली.ते कावरेबावरे झाले.एव्हाना शेतात,घरात इकडून तिकडे फिरताना आपले मालक आपल्याला सोडून देवाघरी गेल्याची जाणीव या मुक्या जीवांना झाली.शोक अनावर झाल्याने त्यांनीही अन्नपाणी घेतले नाही. – सुभाष लोमटे, तुळशीराम लोमटे यांचे चिरंजीव.