रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची घटना विरेगाव (ता.घनसावंगी) शिवारात शुक्रवार (ता.सात) सकाळी नऊ वाजता घडली.जखमी महिलेवर जालना येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.अयोध्या मच्छिंद्र पवार (रा.विरेगव्हाण तांडा) असे जखमी महिलेचा नाव आहे.रब्बी हंगामातील ज्वारी,बाजरी,मका, पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने शेतशिवारात कापणी,खुरपणी,सोंगणीच्या कामाची लगबग सुरू असून विरेगाव येथील अयोध्या पवार हि महिला गट नंबर ८७ मधील शेतात उसाची खुरपणी करीत असताना रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला.यावेळी सदरील महिलेने आरडाओरड केल्याने जवळील शेतातील शेतकरी धावून आल्याने रानडुकराने तेथून पळ काढला.या हल्ल्यात सदरील महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे.येथील पिकांची ही रानडुकरांकडून नासाडी केली जात असून,वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.