जिल्हात लसीकरणाच्या रांगेतील नागरिकांची अँटीजेन तपासणी करा-आरोग्यमंत्री राजेश टोपे
बाधित रुग्णांशी फोनद्वारे संवाद साधुन उपचाराच्याअनुषंगाने मार्गदर्शन करा
बाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबणार नाहीत याची दक्षता घ्या
-पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
जालना, दि. 10 (NewsJalna):- जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत असुन वाढता संसर्ग रोखण्यासाठी टेस्टींगचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढवत बाधित रुग्णांच्या सहवासितांचा शोध काटेकोरपणे घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते.
यावेळी यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे , निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगांवकर, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचा दर वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्युही होत आहे. जिल्ह्यात वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याबरोबरच बाधित रुग्णांच्या सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात यावा. डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसमवेत त्यांचे नातेवाईक थांबत असल्याचे निर्दशनास येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असुन यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात फैलावु शकत असल्याने कुठल्याही ठिकाणी बाधित रुग्णासोबत नातेवाईक थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. प्रत्येक कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड केअर सेंटरवर पोलीस प्रशासनामार्फत पोलीसांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच उप विभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी सातत्याने या सेंटरला भेटी देऊन पहाणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री टोपे म्हणाले, ताप, सर्दी, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानासुद्धा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत व रुग्णांची प्रकृती खालावून अनेकप्रसंगी रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे बाधित असलेल्या प्रत्येक रुग्णांशी डॉक्टरांनी फोनद्वारे संवाद साधुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती दरदिवशी जाणुन घेऊन त्यांना उपचाराच्यासंदर्भाने आवश्यक ते मार्गदर्शन करावे. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणाच्या ठिकाणी रांगेमध्ये उभे असलेल्या नागरिकांची अँटीजेन तपासणी करण्यात यावी. जेणेकरुन नागरिक बाधित असल्यास त्याच्यापासुन दुसऱ्याला होणारा संसर्ग रोखण्यास मदत होण्याबरोबरच लसही वाया जाणार नसल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
कोरोना बाधित अथवा संशयित रुणांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा प्राधान्याने मिळाव्यात. या ठिकाणची स्वच्छता दररोज होईल याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जाही उत्तम राहील, याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ ठेवण्याबरोबरच डीसीएचसी, सीसीसीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या रुग्णांबरोबरच गृहविलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची सीबीसी, सीआरपी आदी चाचण्या प्राधान्याने करण्याच्या सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.
खासगी दवाखान्यात कोविड बधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या देयकांचे दर शासनाने ठरवून दिले आहेत. रुग्णांना उपचारापोटी देण्यात येणारी देयके तपासण्यासाठी प्रत्येक खासगी दवाखान्यात परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून या परीक्षकांकडून प्रत्येक देयक काटेकोरपणे तपासले जाईल व नागरिकांकडून अधिकचे देयक घेतले जाणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी केली.
जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यांबरोबरच सीसीसीमध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध राहण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, तांत्रिक कर्मचारी, सेवक आदी पदांची तातडीने भरती करण्याबरोबरच नवनियुक्ती डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात यावे. जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र शववाहिका तातडीने खरेदी करण्याच्या सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.