महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची जिल्हा कोव्हीड रुग्णालयाला भेट
रुग्णालयातील सोई-सुविधांची केली पहाणी-रुग्णसेवा करणाऱ्या सर्व कोरोना योद्धयांचे मानले आभार
जालना, दि. 11 (न्यूज जालना):- राज्याचे महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दि. 11 मे रोजी जालना येथील जिल्हा कोव्हीड रुग्णालयाला भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पहाणी करुन खासगी रुग्णालयाच्या बरोबरीची व्यवस्था असणारे हे रुग्णालय उभारण्यात आले असुन याबाबत समाधान व्यक्त करत कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा सर्व डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार या सर्व कोरोनायोद्धयांचे आभारही व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, भास्कर आंबेकर, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, बाला परदेशी, मनिष श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री सत्तार म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जालना येथे खासगी हॉस्पीटलच्या बरोबरीची व्यवस्था असलेल्या शासकीय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असुन रुग्णांना उपचारासाठी आयसीयु, ऑक्सिजन बेड, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी ऑक्सिजन प्लँट तसेच स्वॅब तपासणीसाठी स्वतंत्र व अद्यावत अशा प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी 1 हजार 400 स्वॅबची दररोज तपासणी करण्यात येत आहेत. गत एकवर्षापासुन येथील डॉक्टर, नर्स, सफाईकामगार हे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत असुन कोरोना संकटाचा धैयाने मुकाबला करत आहेत. भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचे सांगत सर्व कोरोनायोद्ध्यांचे त्यांनी आभारही यावेळी व्यक्त केले.