मान्सुन कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
पुरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवाऱ्यांचे नियोजन करा
जालना, दि. 17
मान्सुन कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी गावपातळी तसेच तालुका पातळीवरील परिपुर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे 25मे पर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले.
मान्सुन पुर्वतयारी आढावा बैठकीचे दि. 17 मे रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बिनवडे बोलत होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील मान्सुन कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपुर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. सर्व तहसीलदार कार्यालये, पोलीस स्टेशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महावितरणच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करावा. जालना जिल्ह्यामध्ये गोदावरी, दुधना, केळणा, पुर्णा, गिरजा या प्रमुख नद्या असुन एकुण सात मध्यम व 57 लघु प्रकल्प आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पुररेषा आखणीचे कामही तातडीने पुर्ण करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिल्या.
पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे. परंतु कोरोनामुळे अनेक नागरिकांना एकाच ठिकाणी ठेवणे धोक्याचे ठरणार असल्याने अधिक प्रमाणात निवाऱ्यांची पहाणी करुन त्याबाबत सुक्ष्म असे नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अन्नधान्य, पाणी आदी व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर, कोव्हीड केअर या ठिकाणी ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांना विनाखंडितपणे ऑक्सिजन मिळावा यासाठी या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जनरेटर सुस्थितीत असल्याबाबत खात्री करण्यात येऊन वीज खंडीत होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात असलेल्या विविध पाणी साठवण प्रकल्पांसह साठवण तलाव, पाझर तलाव आदींची पहाणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असेल ती तातडीने करुन घेण्यात यावी. आपत्तीच्या काळामध्ये विद्युत पुरवठा तसेच दुरध्वनी सेवा अखंडित सुरु राहील याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. पूरप्रवण, तलाव क्षेत्रामध्ये गावशोध व बचाव पथक, पूर्वसुचनागट आदी व्यवस्था चोख ठेवण्याबरोबरच प्रत्येक उप विभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातुन वाहणाऱ्या नदीचे, नाल्यांचे नैसर्गिक पात्र अतिक्रमणामुळे अरुंद झाले असेल तर अशा ठिकाणची अतिक्रमणे तातडीने काढावीत. जिल्ह्याच्या शहरी भागातील गटार व्यवस्था, नालेसफाई व नैसर्गिकपणे वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात अडथळा निर्माण करणारी झाडे, झुडपे काढून पाण्याचा निचरा योग्यरितीने होईल, याबाबतही उपाययोजना करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
मान्सुन कालावधीत पसरणाऱ्या साथींच्या रोगापासुन बचाव होण्यासाठी तसेच रोगराई पसरल्यास निदानासाठी उपायोजना आखुन ठेवण्याबरोबरच प्रत्येक शासकीय रुग्णांलयांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधीचा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची तपासणी करण्यात येऊन काही बिघाड असल्यास ते तातडीने दुरुस्त करुन घेण्यात यावे. तसेच एनडीआरएफ सोबत समन्वय ठेवण्यात यावा. तलावातील क्षेत्रात अथवा गावात त्या तलावाची धोक्याची पातळीपर्यंत जाण्यापूर्वी तसेच धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत देण्यात आलेल्या संदेशाची गावातील नागरिकांना पुर्वसुचना देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी पॉवरपाँईटच्या माध्यमातुन आपत्तीच्या काळात कोणत्या विभागाने काय कार्यवाही करावयाची आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती दिली.
दुरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार यांच्यासह जिल्हयातील यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.