करोना महामारीत प्रामाणिक सेवा देणार्या वीज कामगांराच्या मागण्या तातडीने मार्गी लावा
आ. कैलास गोरंट्याल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जालना (प्रतिनिधी) ः करोना महामारी असतांनाही कोणतीही तमा न बाळगता लॉकडाऊन काळात देखील राज्यातील
16 कोटी 88 लक्ष वीज ग्राहकांंना सेवा देत असलेल्या वीज वितरण कंपनी अंतर्गत कार्यरत असलेल्या अभियंतासह सर्व कर्मचार्यांना
फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देवून त्यांच्या सर्व मागण्या सोडवाव्यात अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केेली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात आ. गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यासह देशात करोनाच्या महामारीमुळे लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य असतांना अशा परिस्थितीत व पाऊस, चक्रीवादळ येऊन देखील राज्यातील 86 हजार वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार 24 तास राज्यात अविरत सेवा, वीज निर्मिती, वीजपुरवठा सुरळीतपणे सुरु ठेवला आहे. कोव्हीड हॉस्पीटल, दवाखाने, पाणी पुरवठयासाठी वीज सेवा अखंडीत सुरु ठेवली. कोव्हीड 19 संसर्गाच्या भयंकर परिस्थीतीत वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार सेवेस तत्पर होते. अशा सर्व वीज कर्मचार्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासना प्रमाणे सुविधा देण्यात याव्यात, कर्मचारी व
त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, वीज कर्मचारी, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने काम बंद आंदोलना बाबत निवेदन प्राप्त झालेले असुन संघटनेच्या मागण्या खालील प्रमाणे अपणा समोर मांडत आहे.
कोव्हिड 19 मुळे मृत्यू पावलेल्या वीज कामगारांना रुपये 50 लाख अनुदान देण्यात यावे,
तिनही कंपन्या करीता एमडी इंडीया या जुन्याच टिपीएची नेमणुक करावी, कोव्हीड संसर्गाचा उद्रेक पहाता विजबील वसुली बाबत कर्मचार्यांना सक्ती करण्यात येऊ नये, इत्यादी मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन चालु आहे. वीज कामगार सातत्याने आपली सेवा बजावत असून त्यांच्या मागण्या रास्त आहेत. या मागण्या बाबत सकारात्मक विचार करुन त्या सोडविण्यासाठी शासनाने गांंभीर्याने पावलं उचलावीत अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.