उत्कृष्ट भाषण पुरस्काराने आरोग्यमंत्री राजेश टोपे सन्मानित
मुंबई, दि.7: विधान मंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधीमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्यल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना 2016-17 साठीच्या उत्कृष्ट भाषण पुरस्काराने आज गौरविण्यात आले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्यावतीने (कॉमनवेल्थ पार्लमेंट्री असोसिएशन- महाराष्ट्र ब्रँच) विधानपरिषदेचे सहा आणि विधानसभेचे सहा अशा एकूण बारा सदस्यांना पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानपरिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, आरोग्यमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते.