कुंभार पिंपळगावसह परीसरात अवैध धंदे बोकाळले;पोलिस प्रशासनास जाग येईना
तळीरामांचा गल्लीबोळात वावर,ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी
कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी कुलदीप पवार
सध्या कोरोना व लाकडाउन मुळे सध्या नागरीक त्रस्त असले तरी अवैधरीत्या मटका,जुगार,दारू,गुटखा,गांजाविक्री,अशा अवैध धंद्याना कुंभार पिंपळगाव सह परीसरात ऊत आला आहे.तर पोलिस प्रशासन मात्र डोळे बंद करून बसल्याचे दिसत आहे.ग्रामीण भागात कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.काही व्यक्तींकडून खुलेआम अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.कुंभार पिंपळगाव व परीसरातील लिंबी,गुंज,जांबसमर्थ,मुर्ती,शिवनगाव,पिंपरखेड, या ठिकाणी दारूची अवैधरित्या विक्री खुलेआम सुरू आहे.कुंभार पिंपळगाव ते पाथरी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी ढाब्यावर दारू मिळत असून,अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांचे ढाबे रस्त्यालगत असल्याने या ठिकाणी तळीरामांची नेहमीच गर्दी असते.कुंभार पिंपळगाव व परिसरात खुलेआम दारू विक्री सुरू असताना पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे.मटक्याप्रमाणे जुगार,दारू,गुटखा,गांजाविक्री,असे सर्रासपणे काळे धंदे खुलेआम सुरु आहे.अवैधरित्या व्यवसायांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात खुलेआम हे व्यवसाय सुरु आहे.त्यामुळे कुंभार पिंपळगाव व परीसरात मटका,दारु,गुटखा,अवैधरित्या विक्री करणाऱ्या व्यक्तिंना राजकिय वरदहस्त मिळत आहे.त्यामुळे बाजारपेठ व परिसरातील गावात दिवसेंदिवस अवैध धंद्याना बळकटी मिळत असून अनेकांनी आपले साम्राज्य उभे केले आहेत.यातूनच आता नव्याने रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्याकडून अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तिविरूद्धात कारवाईची मागणी केली जात आहे.