घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन
जालना, दि.2 – जिल्ह्यातील गोरगरीबांसह प्रत्येक सर्वसामान्यांपर्यंत विकासाची गंगा पोहोचुन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावे यासाठी आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, कृषी, सिंचन या बाबींवर अधिक प्रमाणात भर देण्यात येत असुन जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानाचे लोकार्पण पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, कल्याणराव सपाटे, भागवत रक्ताटे, नानाभाऊ उगले, जीवनराव वघरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, भास्करराव गाढवे, सुधाकरराव काळे, बापुराव देशमुख, राजाभाऊ देशमुख, रविंद्र आर्दड, संभाजी देशमुख, भागवत सोळुंके, शिवाजीराव काकडे, डॉ. नंदकिशोर उढाण, सुदामराव मुकणे, समद बागवान, नजिम पठाण, सुनिल उगले, अतिक पटेल, जगदिश नागरे, वडगावकर, आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासुन या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम विविध अडचणींमुळे रखडले होते. परंतु आज यानिमित्ताने या वास्तुचे काम पुर्ण होऊन त्याचे लोकार्पण होत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. जवळपास 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करुन सर्व सोयी-सुविधांनीयुक्त व दर्जेदार अशा प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. जिरडगाव व परिसरातील गावांमध्ये असलेल्या 31 हजारापेक्षा अधिक नागरिकांना आरोग्याच्या सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. याठिकाणी विविध आजारावरील उपचार, तसेच छोट्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया, महिलांच्या प्रसुती, कुटूंबनियोजन यासारख्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार असुन याठिकाणी स्वतंत्र अशी रुग्णवाहिका व आवश्यक ते मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात आले असुन या उपकेंद्रामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांना उपचार घेण्याची गरज भासणार नसुन या केंद्रामार्फत मोफत स्वरुपात देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करत या ठिकाणी संरक्षक भिंत तसेच अंतर्गत रस्त्याची कामे येत्या आठ दिवसांमध्ये पुर्ण करण्यात येऊन पुर्ण क्षमतेने हे उपकेंद्र सुरु करण्याच्या सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी आरोग्य प्रशासनाला यावेळी दिल्या.