जालना शहरातील 3 प्रमुख रस्त्यांसह भुमीगत नाली बांधकामासाठी
राज्य शासनाकडुन 6 कोटीचा निधी उपलब्ध ः आ. गोरंट्याल
जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील 3 प्रमुख रस्त्यांच्या कामांसह प्रिती सुधानगरमधील भूमीगत नाली बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने जालना नगर पालिकेला वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून या निधीतून सदर कामे लवकरच सुरु करणार असल्याची माहिती आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.
जालना शहरात काही दिवसांपुर्वीच सुमारे 30 कोटी रुपये खर्चुन करण्यात येणार्या 6 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय रेेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्ष सौ. संगिताताई गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. याच कार्यक्रमात बोलतांना आ. कैलास गोरंट्याल यांनी शहरातील काही प्रमुख रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली होती. या दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करत आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडुन शहरातील 3 रस्त्यांच्या सिमेंटीकरणासह भुमीगत नाली बांधकामासाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे. या निधीतून शोला चौक ते रामदेव बाबा मंदीर, टिपु सुलतान चौक ते पित्ती पेट्रोल पंप, गाढे चौक ते लक्की ज्यूस सेंटर व्हाया दिपक हॉस्पीटल, प्रित्ती सुधानगर अंतर्गत भुमीगत नाली बांधकाम ही कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगुन शहरातील प्रलंबित कामांसाठी राज्य शासनाकडुन आणखी भरीव निधी खेचून आणणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगितले आहे.