भोकरदन शहरात मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरात शिरले पाणी
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन शहराच्या विविध भागात मंगळवारी (दि. ३१) सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. नगर पालिकेच्या वतीने पावसाळ्यापुर्वी मोठ्या नाल्यांची साफसफाई न केल्याने घरात पाणी शिरल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
रफिक काॅलनी, नुराणी परिसर, नुतन काॅलनी, फत्तेपुर रोड आदी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. सकाळी चार ते अकराच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
भोकरदन शहरातील रफीक काॅलणीत नाल्यांचे पाण्याचा प्रवाहच लोकवस्तीत वळला.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांच्या घरात पाणी शिरते.ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे.मंगळवारी सकाळी येथील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिक हवालदील झाले व रात्र जागून काढली.
सकाळी जोरदार पाऊस झाल्यास पाणी घरामध्ये शिरते.यामुळे लहान मुले, नागरिक घाबरुन गेले होते. घराच्या चारही बाजूंना पाण्याने वेढलेले होते. संपूर्ण अन्नधान्य, घरगुती वस्तुंचे नुकसान झाले आहे.या भागात मोठ्या नाल्यांची स्वच्छता नगर पालिकेच्या वतीने पावसाळ्यापुर्वी न केल्याने घरात पाणी घुसल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.त्यामुळे नाल्यांची स्वच्छतेची कामे त्वरीत करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.