वातावरणातील बदलामुळे घनसावंगी तालुक्याला आला ताप; रुग्णसंख्येत वाढ

डॉक्टरांकडून वेगवेगळ्या तापसण्यांची सूचना : रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त
घनसावंगी प्रतिनिधी / नितिन राजे तौर
वातावरणात अचानक झालेल्या बदलांमुळे निम्म्याहून अधिक नागरिकांना आजारांनी ग्रासलं आहे. ताप, सर्दी ,खोकला, न्यूमोनिया व डेंगूसारख्या आजारांचे घराघरात रुग्ण सापडत आहेत. नेहमीच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लहान मुलांसोबतच मोठ्यांचीही दवाखान्यांमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे.
तसेच या रुग्णांमध्ये लहान मुलांचे अधिकच प्रमाण असुन नेमकं दूषित वातावरण झालं तरी कशामुळे याचा ताळमेळ लागत नसल्याने डॉक्टरांकडून वेगवेगळ्या तपासण्या करण्याच्या रुग्णांना सूचना दिल्या जात आहेत.
घनसावंगी तालुक्यासह जिल्हाभरात रुग्णांची संख्या वाढत असुन स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामीण रुग्णालयाकडून धुरफवारणी व जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
गेल्या आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातला असुन या काळात परिसरात सातत्याने ढगाळ वातावरण आहे. गार वारे सुटले आहेत. त्यामुळे हवेतली आर्द्रता वाढली आहे. यात हवेतल्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक आजारी पडत आहेत. लहान मुलांसहित मोठ्या माणसांनाही आजारांनी ग्रासलं आहे. अनेकांना सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला अशी लक्षणं दिसत आहेत.
सध्या व्हायरल फिव्हर, इन्फ्लूएन्झा, डेंग्यू, चिकनगुनियासारख्या आजारांचं प्रमाण जास्त आहे. व्हायरल फिव्हरमध्ये अनेक रुग्णांना औषध-गोळ्या घेऊनही ताप उतरत नसल्याचं दिसतंय. इन्फ्लूएन्झामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणं दिसत आहेत. अनेकांचा ताप ५-६ दिवस जात नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये दुसराच काही आजार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर तपासण्या आणि चाचण्या केल्यास त्याचाही आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे.
तसेच नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यात कोरोना आणि व्हायरल फिव्हरची लक्षणं सारखीच असल्याने नागरिक आणि लहान मुलांचे पालक घाबरून जात आहेत. रुग्णांचा ताप जात नसल्याने कोरोना आणि इतर काही लक्षण दिसतात का यांच्या चाचणी आणि तपासण्या करण्यात वाढ झाली आहे आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर विविध प्रकारच्या तपासण्या करण्यास सांगितलं जात आहे. यात रक्त, लघवी, कोरोनासह इतर चाचण्यांचा समावेश आहे. ज्यांना किरकोळ लक्षणं आहेत त्यांना गोळ्या-औषधांसोबत गरज वाटल्यास इंजेक्शनही दिलं जात आहे. व्हायरल फिव्हर, फ्लू, डायरिया, न्यूमोनिया ब्राँकायटिसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.