कुंभार पिंपळगावातील रोहित्राला वेलींचा विळखा !
कुंभार पिंपळगाव:येथील सरस्वती भुवन शाळेलगत असलेल्या रोहित्राला अशा प्रकारे हिरव्या वेलींचा विळखा पडलेला आहे.याकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावसह परीसरातील अनेक गावांतील विजवितरणाच्या रोहित्र व विजेच्या खांबावर हिरव्या वेलींचा वेडा पडलेला आहे.हा हिरवा वेलींचा वेडा अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे.याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील शेतशिवारात अनेक खांब,रोहित्र धोकादायक स्थितीत आहे.त्यात अनेक खांबासह रोहित्राला वेलींनी वेडा दिलेला आहे.जमिनीवरून रोहित्रात वेल पोहोचल्यावर याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.कुंभार पिंपळगावातील अंबड पाथरी राज्य रस्त्यावरील रोहित्राला वेलींचा विळखा पडलेला आहे. या रस्त्यावरून ग्रामस्थ,वाहनधारक तसेच विद्यार्थी, ज्ञानार्जनासाठी शाळेत ये-जा करीत असतात.संपूर्ण रोहित्राला वेलींचा विळखा पडलेला आहे.त्याचबरोबर अनेक ठिकाणी असे चित्र पाहावयास मिळत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.