निर्यातीसह मोसंबीस ग्राहक मिळवून देणार! शरद पवारांच्या उपस्थितीत महत्त्वाचे निर्णय-अर्जुनराव खोतकर
जालना : मोसंबीची विदेशात निर्यात करण्यासह देशातही ग्राहक मिळवून देण्याचा निर्णय देशाचे माजी कृषिमंत्री, ज्येष्ठनेते शरदराव पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत घेण्यात आला, असल्याची माहिती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली. मोसंबी लागवड, उत्पादन आणि विक्री या संदर्भात मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात दिनांक 6 ऑक्टोबर, बुधवार रोजी नियोजित बैठक पार पडली. आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, युवानेते अभिमन्यू खोतकर यांची यावेळी उपस्थिती होती. राज्याचे फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांना अन्य कामामुळे उपस्थित राहता आले नसले तरी त्यांच्यासोबत या विषयावर बोलणे झाले. या बैठकीतील सर्व वृत्तांत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सुपूर्द करून संयुक्तपणे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.
मोसंबी निर्यातीसाठी राज्यातील प्रमुख व्यापारी आणि आडते यांची बैठक करून निर्यात सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी शरदराव पवार यांनी स्पष्ट केले. तसेच विदेशात मोसंबी पाठवतानाच देशातील अन्य राज्यांतही मोसंबीला ग्राहक कसे मिळवून देता येतील, याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने आपल्याकडे प्रक्रिया उद्योग कसा सुरु करता येईल, मोसंबीतील असिडसह अन्य कोणत्या अडचणी आहेत, याबाबत संबंधित शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यासह देशभरातील रेल्वेस्थानकं, बसस्थानक यांमध्ये मोसंबीचे स्टॉल लावण्याबाबतही या बैठकीत निर्णय झाला. मोसंबी हे आरोग्यदायी फळ असून, हमखास उत्पन्न देणारे फळपीक असल्याने लागवड, उत्पादन व मुख्यतः विक्रीस प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली.
मोसंबी तोडणी तंत्राकडेही पवार यांनी लक्ष वेधले. आंबा जसा इजा न होऊ देता उतरतात तशीच मोसंबीची तोडणी केली पाहिजे. अन्यथा फळ खराब होते. ग्रेडिंग आणि आकर्षक पॅकिंग केल्यास मोसंबीचे मूल्य वाढेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. वाकुळणी, गोलटगाव, कडवंची परिसरातील मोसंबी कशी आहे, अशी विचारणाही ज्येष्ठ नेते पवार यांनी केली. यावेळी आपण कडवंचीसह धारकल्याण, पिरकल्याण, नंदापूर, नाव्हा, वखारी वडगाव आणि एकूणच या परिसरात आता द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले. मोसंबी संदर्भात आपण सांगितलेल्या सर्व मुद्द्यांवर ज्येष्ठ नेते पवार यांनी सविस्तर चर्चा करून घेतलेले निर्णय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि ज्येष्ठ नेते पवार साहेब संयुक्तपणे सोडवणार आहेत. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनीही आपल्या पैठण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मोसंबी असल्याचे सांगून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकुलता दर्शवली. मंत्री राजेश टोपे यांनी मोसंबी हे नगदी उत्पन्न देणारे, हमखास येणारे आणि तुलनेने कमी रोगराई असलेले पीक असून आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लागवड झालेली असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, द्राक्ष, डाळिंब आणि उसाप्रमाणे जेथे जेथे संधी आहे त्या भागात शेतकऱ्यांनी मोसंबी लागवड, उत्पादन आणि विक्रीसंदर्भात आपण असाच सक्रिय प्रयत्न सुरू ठेवू, अशी ग्वाही माजी राज्यमंत्री तथा सभापती अर्जुनराव खोतकर यांनी दिली. चौकट सोयाबीनकडेही दुर्लक्ष नको! अति पावसामुळे आधीच सोयाबीन, कापसाची मोठी हानी झाली आहे. सोयाबीनचे दर केंद्र सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे कमी झाले आहेत. सोयाबीन, कापूस, आणि तूर यासह खरिपातील पिकांचे हमीभाव तरी कमी होऊ नयेत, अशी अपेक्षा अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी व्यक्त केली.