जालना जिल्हा

लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची जालन्यात हाक


जालना (प्रतिनिधी) ः उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपुर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दि. 11 ऑक्टोबर सोमवार रोजी भाजप विरोधी सर्वपक्षीय महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदमध्ये जालना शहर व जिल्ह्यातील सर्व समविचारी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व व्यवसायीकांनी सहभागी होवून हा बंद यशस्वी करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल व जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आज शुक्रवारी घेतलेल्या सयुक्त पत्रकार परिषदेत केले.

images (60)
images (60)

येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, उत्तर प्रदेश राज्यात लखीमपुर येथे शेतकरी विरोधी तयार करण्यात आलेले तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी त्या भागातील शेतकरी शांततेच्या व लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. हे आंदोलन सुरू असतांना भाजपा नेते व केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राने आपल्या सहकारी मित्रासह भरधाव वाहन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर घालून चिरडून ठार मारले. ही घटना घडून आता पाच ते सहा दिवसाचा कालावधी झालेला असतांना उत्तर प्रदेश सरकारच्या दबावाखाली लखीमपुर येथील पोलीसांनी अद्याप शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राला अटक केली नाही.

एकीकडे महाराष्ट्रातील अनेक मंत्र्याच्या मागे केंद्रातील भाजपा सरकारने ईडीसह अन्य कारवाया करून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न चालवला असतांना दुसरीकडे शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या भाजपा नेत्याच्या पुत्राविरूध्द अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. केंद्रातील भाजपा सरकार हा दुजाभाव कशासाठी करत आहे असा परखड सवाल आ. कैलास गोरंट्याल व जिल्हध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी उपस्थित केला आहे.


या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या श्रीमती प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारच्या दबावामुळे स्थानिक पोलीसांनी अनावश्‍यकपणे अटक करून त्यांना बळजबरीने रोखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आ. गोरंट्याल यांनी उत्तर प्रदेश सरकारसह पोलीसांच्या कृत्याचा निषेध केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ दि. 11 ऑक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंदमध्ये भाजपा विरोधी असलेले सर्व पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. विमलताई आगलावे, प्रभाकरमामा पवार, नगरसेवक जगदिश भरतीया, मेघराज चौधरी, अरूण घडलींग आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!