जालन्याची मोसंबी आता थेट दिल्लीच्या मार्केटमध्ये; चांगला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी
जालना : अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी अडचणीत आला आहे. तसंच नैसर्गिक संकटातून आपली पिके वाचवण्यात यश मिळालेल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या भावाची चिंता सतावते. मात्र जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोसंबी, सीताफळ, द्राक्षे, डाळिंब ही फळे थेट दिल्ली, राजकोट, सुरत, अमृतसर या शहरांमध्ये पाठवण्याचा मार्ग खुला झाला आहे. या बाजारपेठांमध्ये दुप्पट आणि तिप्पट भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. सचखंड एक्सप्रेसने गुरुवारी जालन्यातील मोसंबी दिल्लीकडे रवाना झाली आहे.
कृषी विभागाच्या प्रयत्नातून जिल्ह्यात उभ्या राहिलेल्या उत्पादक कंपन्यांची चळवळ आता चांगलाच जोर धरू लागली आहे. जालना जिल्ह्यामध्ये बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मोसंबी, सीताफळ रेल्वेने दिल्ली येथील बाजारपेठेत पाठवण्यात येत आहे. जालना मोसंबी उत्पादनासाठी अग्रेसर असून जिल्ह्यातील मोसंबी आता राज्याबाहेरील बाजारपेठेत जाऊ लागल्याने अडचणीत सापडलेल्या मोसंबी उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे.
जालना येथील बी.पी.जी अर्थात बळीराजा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून फळ उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठी संधी मिळाली आहे. मोसंबीची प्रतवारी करून विशिष्ट पॅकिंगमध्ये ही मोसंबी पाठवली जात आहे आणि बाहेरील राज्यात त्यांना दुप्पट आणि तिप्पट भावही मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची हमी मिळाली आहे,’ असं बळीराजा उत्पादक कंपनीचे भास्कर पडूळ यांनी सांगितलं.
रावसाहेब दानवे यांच्या निर्णयानेही झाला फायदा
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून जालना शहरापासून शेतकऱ्यांसाठी २५ टन मालासाठी रेल्वेच्या बोगीची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून रावसाहेब दानवे यांचेही आभार मानण्यात आले