दिवाळी अंक २०२१

दिवाळी ! म्हणजे काय?

हा खरेतर कृषी संस्कृतीमधील महत्त्वाचा सण. शेतीचा शोध सुमारे आठ ते दहा हजार वर्षांपुर्वी स्त्रीयांनी लावला. सामुहिक शेतीच्या या काळात खरिपाच्या पीकांची मळणी व खळे करणे ही कामे सामुदायिकरित्या दस-यानंतर सुरु होत. या काळात सर्व स्त्री-पुरुष या कामात मग्न रहात आणि ही सर्व कामे दिवाळीपुर्वी संपवित.

images (60)
images (60)

दिवाळीच्या पहिल्या दिवशी
शेतक-यांचा सच्चा साथी बैल(गो-हा) व त्याला जन्म देणारी गाय यांची पुजा करुन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाई. तीच वसु बारस.

दुस-यादिवशी खळ्यात तयार झालेल्या धान्याच्या राशीची शेतात पुजा केली जाई. मानवाला जगण्यासाठी सर्वाधिक आवश्यकता धान्याची असते. तीच खरी धनदौलत होय. हा दिवस धनत्रयोदशीचा.

तिस-या दिवशी वाजत गाजत हे धान्य गावात आणले जाई. त्यादिवसापासुन वर्षभर सर्वांच्या भुकेचा प्रश्न मिटला. आता वर्षभर भुकेच्या,उपासमारीच्या, दारिद्रयाच्या नरकापासुन मुक्तता मिळाल्याचा हा दिवस नरकचतुर्दशी होय.

या धान्याचे समान वाटप केले जाई. सर्वजण हे धनधान्य आपापल्या घरी घेऊन जात. या धान्याच्या रुपाने साक्षात लक्ष्मी आपल्या घरी आली आहे. या लक्ष्मीकृपेने आपण समृद्ध झालो आहोत. आपल्याला आता दारिद्रय येणार नाही. त्यासोबतच हे धान्य वाळवुन, कुटुन, दळुण,भाजुन अथवा शिजवुन आपले प्रत्यक्ष पोषण करणा-या आपल्या घरातील स्त्रीया या सुद्धा साक्षात् लक्ष्मीच होत. याच कृतज्ञतेच्या भावनेतुन या दिवशी घरात आलेल्या धान्यलक्ष्मीची व गृहलक्ष्मीची पुजा केली जाई. हा दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपुजन होय.

बळीराजा हा शेतक-यांचा राजा. तो न्यायी, पराक्रमी, प्रजाहितदक्ष व तत्वज्ञ होता. राज्याचे सर्व उत्पादन प्रजेमध्ये समान वाटप करणारा समविभागी नायक होता. बळीराजामुळे भुकेची काळीकुट्ट अमावस्या संपुन सर्वांच्या सुखसमृद्धिचा चंद्रोदय झाला आहे. या कृतज्ञ भावनेतुन प्रतिपदेच्या दिवशी ‘बळीराजा गौरव दिन’ अर्थात बलीप्रतिपदा साजरी केली जाते व आजही प्रार्थना केली जाते
‘इडा पिडा टळो आणि
बळीचे राज्य येवो!’

मृत्यु हे मानवी जीवनातले अटळ, अंतिम व शाश्वत सत्य होय. नित्याच्या जगण्यात जर मृत्युची आठवण ठेवली तर मनुष्य गर्व,अहंकार,आत्मप्रोढी यापासुन दुर राहतो. मृत्यु नसता तर माणसाला जीवनाचे महत्व कळाले नसते. मृत्यु वाईट नसुन त्यामुळेच तर जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो.जन्म आणि मृत्यु यामध्ये एक अतुट नाते आहे. जन्म आणि मृत्यु एकाच काळाची सहोदर अपत्ये म्हणजेच भाऊ-बहीन होत. यादिवशी मृत्युदेवता यमाची आठवण म्हणुन यमव्दितीया आणि जीवन-मृत्युच्या अतुट सख्यत्वाचे प्रतिक म्हणुन भाऊबीज साजरी करतात.

मित्रांनों, जगातील सर्वात महत्वाचे तत्वज्ञान माणसाच्या पोटाची भूक होय. आधुनिक मानवाने प्रचंड भौतिक प्रगती केली आहे.अनेक क्रांतिकारी शोध लावले आहेत. परंतु त्याच्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले अन्नधान्य व खाद्यपदार्थ कृत्रिमरित्या तयार करण्याचा शोध आजतागायत तो लावु शकला नाही. स्वतःच्या भरण पोषणासाठी त्याला शेतीतून मिळणा-या उत्पादनांवर अथवा निसर्गातुन मिळणा-या वनस्पति आणि प्राणीजन्य पदार्थांवर अवलंबुन रहावे लागते. आज आपला सर्वांचा पोषिंदा बळीराजा अत्यंत हलाखीच्या परिस्थितित आहे. रोज शेकडो शेतकरी आत्महत्या करताहेत. विचार करा या जगातुन शेतकरी संपला तर आमचे काय होणार? मानवी जीवन संपुन जाईल.
मानवी जीवन ज्यांच्याशिवाय निर्माणच होऊ शकत नाही आणि ज्यांच्याशिवाय पुढेही जाऊ शकत नाही त्या स्त्रीयांना जन्माला येण्यापुर्वीच संपवण्यात येत आहे. त्यांच्यावरील अन्याय,अत्याचाराने क्रोर्याची परिसीमा गाठली आहे. यामुळे मानवी जीवनाच्या अस्तित्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेला तिसरा घटक म्हणजे निसर्ग. मानवाने आपल्या हव्यासापायी व तथाकथित प्रगतीच्या नावावर निसर्गाला अक्षरशः उद्ध्वस्त करणे लावले आहे. हे असेच सुरु राहिले तर पृथ्वीचा व पर्यायाने मानवजातिचा अंत अटळ आहे.

या दिवाळी निमीत्त आपण सर्वजन कागदाच्या नोटा, प्रतिमा, फोटो अथवा सोने नाणे या सारख्या आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक नसलेल्या गोष्टींची पुजा करण्यापेक्षा आपणांस विनामोबदला भरभरुन देणा-या निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प करु. अहोरात्र परिश्रम करुन आपल्याला सुखमय जीवन देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे शेतकरी व स्त्रीया यांचा सन्मान करु. त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊ.
हीच आजची खरी दिवाळी.
या प्रकाशपर्वानिमीत्त या दिवाळीत आपल्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय,अहंकार, द्वेष,अनिष्ट रुढी-परंपरा व असहिष्णुता यांचा अंधार दुर करुन ज्ञानाची व प्रेमाची दिवाळी निश्चितच साजरी कराल.
याच दिवाळीच्या लाख लाख सदिच्छा.

शिव कथाकार वे मु माहेश्वरमुर्ती विरभद्र स्वामीजी महाराज कुंभार पिंपळगाव

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!