शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्याचा निर्णयम्हणजे हुकुमशाहीचा पराभव ः आ. कैलास गोरंट्याल
कुलदीप पवार (प्रतिनिधी) ः
देशभरातील शेतकर्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि कॉग्रेस पक्षासह भाजपा विरोधी सर्वपक्षीय नेत्यांनी उठवलेली टिकेची झोड लक्षात घेवून केंद्रातील भाजपा सरकारने वर्षभरापुर्वी लागु केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आज शुक्रवारी सकाळी मागे घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा केली असून हा शेतकर्यांसह लोकशाहीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना व्यक्त केली आहे.
जालना शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त प्रितिसुधानगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने वर्षभरापुर्वी शेतकरी विरोधी तीन काळे कायदे संसदेत मंजुर करुन बहुमताच्या जोरावर या कायद्याची देशभरात अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न चालवले होते. परंतू कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी संसदेच्या सभागृहासह सभागृहाबाहेर देखील या कायद्याविरोधात जोरदार विरोध करुन शेतकरी विरोधी असलेले कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. गेल्या वर्षभरापासून झोपेचे सोेंग घेवून शेतकर्यांच्या आंदोलनाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करणार्या केंद्रातील भाजपा सरकारला मध्यंतरी देशात झालेल्या विविध पोट निवडणुकीत बसलेला जबर फटका आणि आगामी काळात होवू घातलेल्या पाच राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभवाची भिती लक्षात घेवून केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घेण्याची घोषणा आज केली आहे. देशभरातील शेतकरी, शेतमजुर आणि कॉग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांनी सातत्याने या काळ्या कायद्याविरोधात दिलेल्या लढ्याचा हा मोठा विजय असून शेतकर्यांना वर्षभराच्या लढ्यानंतर न्याय मिळाला असल्याचे आ. गोरंट्याल यांनी म्हटले आहे.
या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर कॉग्रेस अध्यक्ष शेख महेमूद, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, राम सावंत , विजय चौधरी, अक्षय गोरंट्याल, विष्णु वाघमारे, विनोद यादव, सय्यद करीम बिल्डर, शेख शमशु, अफसर चौधरी, अरुण घडलिंग, योगेश पाटील, नदीम पहेलवान, शेख वसीम, चंद्रकांत रत्नपारखे, राजेश कांबळे, सय्यद मुस्ताक, गणेश चांदोडे, युवराज राठोड, अनस चाउस, अदनानखान, गजानन शेजुळ, गोपाल चित्राल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी करतांना सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या निवडणुकीत युवकांनी मतदानांची प्रक्रीया समजुन घेवून निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नगर सेवक शेख शकील यांनी केले.