कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी धर्मगुरूंनी नागरिकांना प्रोत्साहित करावे-जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
न्यूज जालना दि. 1
आपल्या स्वत:च्या सुदृढ, निरोगी आरोग्यासाठी कोविड प्रतिबंधक लस सर्व नागरिकांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही लस पुर्णपणे सुरक्षित आहे. तरी सर्व धर्मगुरूंनी लस घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे, त्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी 100 टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरीता लसीकरण मोहिमेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असावा म्हणून मुस्लीम धर्मगुरूंसमवेत आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज कुरेशी, मौलाना बिनयामिण वस्तानवी, शेख अख्तर सहाब, मौलाना मुजीब सहाब, मौलाना जुबेर सहाब, मौलाना इसा सहाब, सामाजिक कार्यकर्ते इकबाल सहाब, मौलाना एहसान सहाब, मौलाना मुफ्ती फहीम, शाह आलम साहब, अय्युब खान साहब, जिल्हा रूग्णालयांचे सांख्यिकी सहायक शेख वसीम हनिफ, परिचारक प्रविण गायकवाड आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाच्या दोन लाटेचा सर्वांनी सामना केला आहे. यामध्ये अनेकांनी जवळची माणसे गमावली. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आपले आरोग्य सुदृढ असणे गरजेचे आहे, यासाठी कोविड प्रतिबंधक लस घेणे हा महत्वाचा उपाय आहे. अजुनही अनेक नागरिकांनी लस घेतलेली नाही. ही लस पुर्णपणे सुरक्षित आहे. याचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. विशेष म्हणजे सर्वांसाठी लस मोफत आहे. त्यामुळे मनात कुठलीही शंका, भिती न बाळगता लस घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. धर्मगुरूंनी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे. या लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य आपणास राहिल. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांनी लस घ्यावी, म्हणून धर्मगुरूंनी पुढाकार घ्यावा.
यावेळी धर्मगुरूंनी अधिकाधिक लोकांचे लसीकरण होण्यासाठी प्रबोधन केले जाईल. लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन कुणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली. कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी मास्क अवश्य वापरावा. याबाबतही जनजागृती केली जाईल, असेही सांगितले.