प्लास्टिक मुक्त शहरासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवावा- अनया अग्रवाल
जालना / प्रतिनिधी
पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टिक ने जालना शहर विकृत होत चालले असून वाढते प्रदूषण, बदलते हवामान अशा गंभीर संकटांना तोंड देण्यासाठी ओला व सुका कचरा विलगीकरण करून कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प राबविला जावा. अशी मागणी स्वच्छतादूत इंजि. अनया अग्रवाल यांनी केली आहे.
स्वच्छता दूत इंजि.अनया अग्रवाल यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, जालना शहरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्लास, द्रोन, चिप्सची पाकीटे यासोबतच भाजीपाला व छोट्या वस्तू नेण्यासाठी प्लास्टिक पन्यांचा सर्रास वापर होत आहे.
शहरात फिरताना जिकडे – तिकडे प्लास्टिकचा कचरा साचलेला दिसतो. असे इंजि. अनया अग्रवाल यांनी नमूद केले. गाई, मोकाट जनावरे उघड्यावरील प्लास्टिक खात असल्याचे निदर्शनास येते.
शिवाय डम्पिंग ग्राउंड वर ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण केले जात नाही. ही गंभीर बाब जालनेकरांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. या साठी नागरिकांनी ओला व सुका कचरा स्वतंत्ररीत्या घंटागाड्यां मध्ये टाकावा.
नगरपरिषदेने ही कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा. अशी मागणीही स्वच्छतादूत इंजि. अनया अग्रवाल यांनी केली आहे.