जालना जिल्हा

महिला व बाल विकास मंत्रालयाचा नारी शक्ती पुरस्कार;ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          जालना, दि. 18 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिला, संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इत्यादीसाठी नारी/स्त्री शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. इच्छुकांनी पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. दि. 31 जानेवारी 2022 ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.

images (60)
images (60)

            शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. व्यक्तीगत पुरस्काराकरीता पात्र इच्छुक महिलांचे दि. 1 जुलै 2021 रोजी किमान वय 25 वर्षे असावे. महिला/संस्थांना महिलांशी संबधित क्षेत्रातील किमान 5 वर्षाचा अनुभव असावा. अर्जदाराला यापूर्वी केंद्र शासनाचे नारी शक्ती वा तत्समान पुरस्कार मिळालेले नसावे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महिलांसाठी विशेष कार्य करणा-या पात्र महिलांना, संस्थांना नारी शक्ती पुरस्कार दिल्या जाणार आहे.

पात्रता व अटी, शर्ती व पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाची वेबसाईट www.wcd.nic.in वर उपलब्ध आहे. नारी शक्ती  पुरस्कार हे दि. 8 मार्च 2022 रोजी जागतिक महिला दिनी नवी दिल्ली येथे वितरीत करण्यात येणार आहेत.

            या पुरस्कारासाठी पात्र महिला कार्यकर्त्या व स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इत्यादी यांचेकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन पत्रात नमुद मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने, अर्ज, नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन पध्दतीने केंद्र शासनाचे www.awards.gov.in  या वेबसाईटवर भरावयाचे आहेत. केवळ ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील. अर्ज,नामनिर्देशन भरण्याची तारीख दि. 31 जानेवारी 2022 आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना दूरध्वनी क्र.  02482-224711 येथे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!