श्री क्षेत्र जांबसमर्थ : येथे घ्यावे लागते पतीला पत्नीचे दर्शन
जालना : नवीन लग्न झाल्यानंतर श्री क्षेत्र जांब समर्थ येथील राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या नवरदेवाला (पती) नवरीचे (पत्नीचे) दर्शन घेण्याची परंपरा आहे. वर्षानुवर्षापासून ही परंपरा आजही येथे पाहावयास मिळते.
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे समर्थ रामदास स्वामींच्या जन्माअगोदरचे राम मंदिर आहे. या राम मंदिरात सीतामातेची मूर्ती रामाच्या उजव्या बाजूला आहे. या ठिकाणी स्त्रीला आदिमाया शक्तीचा मान दिलेला आहे. लग्नानंतर प्रथम दर्शनाला आल्यानंतर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा सुमारे चारशे वर्षांपासून अखंड अविरत चालू आहे. ती आजही पाहावयास मिळत आहे. राम मंदिरातील दुर्मीळ वस्तू आजही पाहावयास मिळतात. यात श्रीरामाच्या पायापाशी श्री समर्थ जो दंडावर बांधत असत तो मारुती. समर्थांचे वडील सूर्याजीपंत यांना शके १५२५ माघ शुद्ध सप्तमीला प्रत्यक्ष सूर्यनारायणाने दिलेले श्रीराम पंचायतन भिक्षेच्या वेळी समर्थ झोळीत ठेवीत असत त्या मारुतीची मूर्ती. रामनवमी उत्सवात पंगतीला तूप कमी पडले होते त्यावेळी समर्थ रामदासांनी राम मंदिरातील समोरील आडातील पाणी काढून खापराच्या घागरीतून वाढले. ती घागर आजही पाहावयास मिळते. यासह इतर असंख्य वस्तू येथे आहेत.
रामनवमीचा उत्सव नऊ दिवसांचा. राष्ट्रगुरू श्री समर्थ रामदास स्वामींच्या जन्माने पावन झालेले जांब गाव आज अखिल महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे श्रद्धास्थान बनले आहे. समर्थांच्या पूर्वजांनीच ते वसविले असल्याचा इतिहास आहे. या गावाच्या कुळकर्णीपणाचे वतनही पिढ्यान्पिढ्या श्री समर्थांच्या घराण्यात चालत आले आहे. ज्या ठिकाणी श्री समर्थांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी श्री समर्थांनी विश्वाची चिंता केली व मातोश्री राणूबाईंना म्हणजेच त्यांच्या आईला त्यांनी डोळे दिले तीही पवित्र भूमी, असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात.
नऊ दिवस चालतो रामनवमी उत्सव
या ठिकाणी समर्थांच्या जागेचा शोध घेतला व नेमका ज्या खोलीमध्ये श्रीसमर्थांचा देह धरणीमातेने झेलला ती जागा शोधून काढून तेथे समर्थ भक्त धुळ्याचे श्रीकृण देव यांनी भव्य असे मंदिर बांधले. दरवर्षी येथे रामनवमी उत्सवानिमित्त नऊ दिवस जन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच वर्षातून अनेकदा धार्मिक कार्यक्रम होतात. त्याला राज्यातून भाविक येतात.