अबब : जनधन खात्यात जमा झाले 15 लाख, अन मग बँकेने केले पॅसें होल्ड समोर आला हा प्रकार…
प्रतिनिधी | औरंगाबाद
भाजपचे 15 लाख रुपयांचे आश्वासन केवळ प्रचाराचा भाग असल्याचे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. परंतु, एका शेतकऱ्यासाठी आश्चर्यकारकरित्या ही घोषणा सत्यात उतरली आहे. पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यात काही दिवसांपूर्वी अचानक १५ लाख रुपये जमा झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच पैसे जमा केल्याचे समजून आनदांत शेतकऱ्याने घर बांधून काढले. मात्र, काही दिवसांनी एक वेगळाच गोंधळ पुढे आला. आता बँक, जिल्हा परिषद या शेतकऱ्याकडे पैसे परत करण्याची विनंती करत आहे. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर औटे यांच्या बँक ऑफ बडोदा शाखेतील जनधन खात्यात काही महिन्यांपूर्वी अचानक १५ लाख रुपये जमा झाले. औटे यांना काही तरी चूक झाली असेल पैसे पुन्हा वळती होतील असे वाटले.
मात्र, बरेच दिवस वाट पाहूनही पैसे वळती झाले नाहीत. त्यामुळे औटे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हे पैसे जमा केल्याचे वाटले. शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला पैसे मिळाल्याचा आभाराचा मेल पाठवत खात्यातून ९ लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे काढून घर बांधले. पिंपळवाडी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करायचे १५ लाख रुपये चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जमा झाल्याचे बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांच्या नंतर लक्षात आले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी लागलीच ज्ञानेश्वर यांच्या खात्यातून उरलेली रक्कम वळती करून घेतली असून आता बँक ज्ञानेश्वर औटे यांच्याकडे उरलेले पैसे बँकेला परत करण्याची विनंती करीत आहे.