जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या अमरण उपोषणाकडे प्रशासनाने फिरवली पाठ
जालना (प्रतिनिधी) ः ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील हातपंप, विजपंप देखभाल दुरूस्ती कर्मचाऱ्यांनी दि. 28 जानेवारी 22 रोजी पाच महिन्याचे थकीत सेवा निवृत्ती वेतन व तीन वर्षापूर्वी सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवा उपदान व शासनाकडुन मिळणारे इतर लाभ आजपर्यंत न मिळाल्यामुळे जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दि. 14 फेबु्रवारी सकाळी 11 वाजेपासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले असून या उपोषणाकड प्रशासनाने पाठ फिरवली आहे.
दि. 28फेबु्रवारी 22 रोजी संघटनेच्या वतीने मुख्य कार्याकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रा. पा. पु. डाकोरे यांना लेखी निवेदन देवून सुध्दा आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे संबंधित सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटूंबियावर विविध अजारासाठी औषधोपचार चालु आहे. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलेला असल्याचे सांगीतले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्रीमती वैशाली रसाळ तसेच विभाग प्रमुख डाकोरे कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांनी कोणत्याही प्रकारे उपोषणकर्त्यांची दखल व भेट घेतलेली नाही. उपोषणकर्ते सेवा निवृत्त कर्मचारी हे वयाने जवळपास 55 ते 60 वर्षाच्या पुढील असल्याने विविध अजाराने त्रस्त आहेत. संबंधीतांचे काही अनिष्ठ व विपरीत परिणाम घडून आल्यास याची सर्व जबाबदारी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची राहील. सदरील उपोषणकर्ते हे जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष फकीरा वाघ, सचिव एम. टी. कार्लेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. उपोषण स्थळावर 25 ते 30 सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित आहेत.