जालना जिल्हा

जालन्यात राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

जालना : जिल्हयातील ज्या शासकीय विभागाच्या स्वतःच्या इमारती नाहीत, त्यांच्या स्वतः च्या, हक्काच्या इमारती बांधण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. वन भवन, दिव्यांगांसाठी वेगळे कार्यालय, महिला व बालविकास भवन अशा पद्धतीच्या स्वतंत्र इमारतीसाठीही प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुंटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.

images (60)
images (60)

     जिल्हा क्रिडा संकुलासमोर बांधण्यात येणाऱ्या अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण टोपे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख आदिंची उपस्थिती होती.

    टोपे म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा करणारा विभाग आहे. आपल्या जिल्ह्यातील या विभागाची स्वतःची इमारत असावी यासाठी प्रयत्न करण्यात आला. इमारतीसाठी मोठा निधीही उपलब्ध करण्यात आला आहे. या इमारतीसाठी साधारण 8 कोटी 62 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. दोन मजली असणारी ही इमारत आपल्या जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी ठरेल. जिल्ह्यात ज्या ज्या विभागांकडे स्वतःच्या इमारती नाहीत, त्या बांधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. गेस्ट हाऊसही खूप जुने आहे. तेसुद्धा सुंदर करण्यात येईल. येथील बांधकाम विभागाचे डिव्हिजन एक व डिव्हिजन दोनचे स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी मंजूरी घेण्यात आली आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

        जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील विकासाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, नुकताच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी जालना जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी संपूर्ण निधीची तरतूद केली आहे. सुमारे 365 खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. कुंबेफळ येथे उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचे लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे. आरोग्यमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर, कॅन्सर मोबाईल युनिट, टेलीमेडिसीनची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. टेलीमेडिसीन मार्फत मुंबई, पुण्यातील नामांकित डॉक्टर यांचा सल्ला या ठिकाणी जिल्हा रुग्णालय व पूर्ण ग्रामीण रुग्णालयाला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आपला जिल्हा सक्षम करण्यावर अधिक भर दिला जाईल.

     जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व शासकीय रुग्णालयात यंत्रांमार्फत स्वच्छता व्हावी, जेथे की स्वच्छतेसाठी हाताचा वापर केला जाणार नाही. या अनुषंगाने आरोग्य संस्थेत यंत्रामार्फत स्वच्छता करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर पायलट जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. स्वच्छतेचे हे मॉडेल आपल्या जिल्ह्यात निश्चितपणे यशस्वी ठरेल, अशी मला आशा आहे. त्यामुळे यापुढे कुठल्याही रुग्णालयात अस्वच्छता दिसणार नाही. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शेकडो किलोमीटर पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले आहेत, असे सांगून श्री. टोपे म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल.

यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जालन्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक पराग नवलकर यांनी केले. कार्यक्रमास कल्याण सपाटे, राजेश राऊत, नानाभाऊ उगले, कपिल आकात , बबलू चौधरी आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!