जालना/प्रतिनिधी
जुन्या मोंढ्यातील मातोश्री ॲग्रो सर्व्हिसेस या कृषी सेवा केंद्रास शुक्रवारी (दि.२९) पहाटे सहा वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीच्या या घटनेत कीटकनाशकाचे महागडे डब्बे, फर्निचर, खते आदी साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे वीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जुन्या मोंढ्यातील अर्जुन खोतकर बिजनेस सेंटरमध्ये ज्ञानेश्वर डवले यांचे मातोश्री ॲग्रो सर्व्हिसेस खते व औषध विक्रीचे दुकान आहे. आज पहाटे सहा वाजता या भागात पेपर टाकण्यासाठी आलेल्या मुलास या मातोश्री ॲग्रोच्या शटरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसला. दुकानात आग लागल्याचा अंदाज आल्याने सदर मुलाने दुकानाच्या पाटीवरील मोबाईलवर संपर्क करून ज्ञानेश्वर डवले यांना दुकानातून धूर निघत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच डवले यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर खोक्यांमध्ये द्राक्ष बागांसाठी लागणारी महागडी औषधे, पॉवडर, अन्य कीटनाशके खोक्यांनी पेट घेतल्याने जळून खाक झाली. तसेच फर्निचर, सीसीटीव्ही, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी दाखल होत तासाभरात आग आटोक्यात आली. दरम्यान, आगीच्या या घटनेत सुमारे १९ ते २० लाखांचे नुकसान झाल्याचे डवले यांनी सांगितले.