पी. एम. ई. जी. पी. या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारातील आरोपींना बडतर्फ करण्यात यावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संघटक शिवराज जाधव यांची मागणी
जालना (प्रतिनिधी) ः जिल्हा उद्योग केंद्र आणि खादीग्रामउद्योग मंडळ जालना या कार्यालयाच्या अंतर्गत पी. एम. ई. जी. पी. या योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात 57 जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र संबंधीत महाव्यवस्थापक श्रीमती खरात, उद्योग निरिक्षक भांडे, उपजिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भिमराव वाघमारे, ज्येष्ठ सहाय्यक व्ही. एम. दानी यांनी संगनमत करून भ्रष्ट्राचार केल्यामुळे त्यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करून त्याना कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संघटक शिवराज जाधव यांनी उपोषणावेळी केली आहे.
संघटनेच्या वतीने दि. 18 एप्रिल पासून साखळी उपोषण सुरू असून आज उपोषणाचा 62 वा दिवस असल्याचे सांगीतले आहे. पी. एम. ई. जी. पी. योजनेचा दुरुपयोग करुन रु. 4,37,22,500 रुपयांचा बनावट कागदपत्राधारे अनुदान मागून बँकेची फसवणुक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन परतुर या ठिकाणी शाखा व्यवस्थापक, सातोना ता. परतूर यांनी देखील तक्रार दिलेली आहे. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक अशोक अर्धापुरे यांनी पोलीस ठाणे घनसावंगी येथे 57 लोकांच्या विरोधात भा.दं.वि. चे कलम 420, 409, 468, 471 सह 34 अन्वये गुन्हे दाखल केलेले आहे. परंतु जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीमती खरात व उद्योग निरिक्षक ए. एस. भांडे व खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपजिल्हा ग्रामोद्योग अधिकारी भिमराव वाघमारे, जेष्ठ सहाय्यक व्ही. एम. दानी यांनी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. परंतु यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही. संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येवून त्यांना सह आरोपी करण्यात यावे असेही निवेदनाच्या शेवटी नमूद करण्यात आले आहे.