दाढेगाव येथे दोन मुलांचा ओढ्यातील गाळात फसून मृत्यू
जालना प्रतिनिधी
अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील ओढयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात फसुन दुदैवी मुत्यु झाल्याची घटना आज दुपारी घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दाढेगाव येथील पांडुरंग रामा घुंगासे व लक्ष्मण रामा घुंगासे दोन्ही भाऊ असुन लक्ष्मण घुंगासे हे शेतात राहतात.त्यांच्या पत्नी आजारी पडल्यामुळे लक्ष्मण यांनी मुलांना गावात आणुन सोडले होते.तेव्हा गणेश पांडुरंग घुंगासे (वय १४ वर्षे) हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता.तर महेश लक्ष्मण घुंगासे (वय ५ वर्षं) हा मुलगा शाळेत शिकत नव्हता.यातील गणेश हा शहापूर येथील ओमशांती शाळेत शिकायला होता.
आज शाळेला सुट्टी असल्याने गणेश व महेश हे शेताकडे सायकलवर चालले होते.तर शेतात जाताना रस्त्यामध्ये एक ओढा लागतो.त्या ओढयाला भरपूर पाणी असल्याने त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.या भावंडांनी पोहण्यासाठी आपले कपडे व चपला बाजूला ठेवले.
तेव्हा दोघांपैकी एकाने ओढयात उडी मारली.ओढयात उडी मारताच या ओढयात मोठया प्रमाणात पावसाच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आल्याने तो मुलगा गाळात फसला.आपला भाऊ गाळात फसलेला पाहून त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या भावाने ओढयात उडी मारली.तेव्हा दोघेही या गाळात खोलवर फसले.परंतु दोघांनी हातपाय हालवताच ते गाळात खोलवर फसत गेले यातच दोघांचे दुदैवी निधन झाले.
ही माहिती घरच्यांना व गावातील ग्रामस्थांनी कळताच सर्वानी या ओढयाकडे धाव घेऊन त्या दोघांना वर काढले.विशेष म्हणजे पांडुरंग घुंगासे यांना गणेश हा एकुलता एक मुलगा होता.तर महेश हा लक्ष्मण घुंगासे यांचा मोठा मुलगा होता.दोन्ही मुलांच्या दुदैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.