जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडा- राजेश टोपे
जालना :- जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी कडा प्रशासनाकडे केली आहे. त्या आशयाचे पत्र कडा प्रशासनाला घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी दिले आहे. मराठवाडयात अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात पाऊस झाला आहे. परंतु जालना जिल्ह्यातील अंबड-घनसावंगी व परतूर तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रामध्ये मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यासोबत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात देखील पाणी सोडण्यात यावे जेणेकरून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या सोयाबीन, कापूस, ऊस व इतर पिकांना जीवदान मिळेल.
मागील काही दिवसात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन व कापसासारख्या पिकाचे नुकसान मोठया प्रमाणात होत आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून अधिक्षक अभियंता,तथा प्रशासक,जायकवाडी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद यांना पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या.
अंबड-घनसावंगी व परतूर तालुक्यातील कमी पाऊस झालेल्या भागामध्ये डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी सोडल्याने कालव्याच्या परिसरातील बोअरवेल आणि विहीरीचे पुनर्भरण होण्यास देखील मदत होईल. अंबड-घनसावंगी व परतूर तालुक्यातील कालव्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पिकांनाही यामुळे जीवनदान मिळणार आहे.