जादुटोणाचे प्रकार आढळल्यास पोलीसांशी तात्काळ संपर्क साधा- जिल्हाधिकारी

जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार-प्रसार समितीची बैठक संपन्न
जालना, दि. 25 :- जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जादुटोणाचे प्रकार आढळल्यास जनतेने तात्काळ जवळच्या पोलीस स्थानकात याबाबतची माहिती देण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अमित घवले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आर.एन चिमिंद्रे, एस.जे. चौधरी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी अधिनियम 2013 जारी करण्यात आलेला आहे.
या कायद्याची परिणामकारक व योग्य अंमलबजावणीसाठी जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात सर्वदूर या कायद्याची जनजागृती करण्यात यावी. शाळा, महाविद्यालयांमधून जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती देणाऱ्या व्याख्यानांचे, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. तसेच ग्रामीण भागामध्येही याची प्रभावीपणे जागृती करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी दिल्या.