वडीकाळ्या येथे पती पत्नीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
अंबड प्रतिनिधी
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील वडीकाळा येथे पती पत्नीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . शनिवारी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली . खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्जाची परतफेड होत नसल्याने दोघांनी आपली जीवनयात्रा संपविली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . अंबड तालुक्यातील वडीकाळा येथील संजय भाऊराव ढेबे ( 45 ) व पत्नी संगीता संजय ढेबे या दांपत्याकडे वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांचे कर्ज होते .
तसेच ट्रॅक्टरच्या हप्त्याचीही परतफेड करणे बाकी होते . ट्रॅक्टरचा 82 हजार रुपये रुपये हप्ता शिल्लक होता . यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने खरीपाचे पीक देखील धोक्यात आले आहे . फायनान्स कंपनीच्या वारंवार हप्ते भरण्याच्या तगाद्याने व शेतात देखील उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले . याला कंटाळून दाम्पत्याने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली . ही खळबळजनक घटना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .
सकाळ झाली तरी घरातुन कोणी बाहेर येत नसल्याने घराशेजारी राहत असलेल्या सिंधुबाई शामराव ढेबे यांनी या पती पत्नीला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघितले . त्यानंतर गावातील सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील यांना याची माहिती दिली . पोलीस पाटील राजेंद्र गाडेकर यांनी या घटनेची माहिती गोंदी पोलीस ठाण्याला कळविली . यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . एक एकर शेती असल्याने ते ऊसतोड तसेच मुकादम म्हणून स्वतःच्या ट्रॅक्टरवर उस वाहतूक करण्यासाठी देखील जात होते . अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली . आत्महत्या केलेल्या दांपत्याला पवन हा एक मुलगा तसेच सुन आहे . व एका मुलीचे लग्न होऊन ती सासरी आहे . या दांपत्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
सुखापुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी शितल शिनगारे यांनी या मृतदेहांचे शवविच्छेदन केले . गोंदी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती बीट जमादार मदन गायकवाड यांनी दिली . घटनास्थळी पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी भेट दिली . संगीता ढेबे यांच्याकडे स्वतंत्र फायनान्सचे 60 हजार रुपये , चैतन्य फायनान्सचे 45 हजार रुपये व संजय ढेबे यांच्याकडे महिंद्रा कोटकचे ट्रॅक्टरवर 1 लाख रुपये तसेच श्रीराम फायनान्स 50 हजार रुपये व शेतीसाठी काही कर्ज घेतल्याची माहिती मिळत आहे . या कर्जाची परतफेड होत नसल्यामुळेच या दाम्पत्याने आत्महत्या केली असल्याचे मृतकाचे नातेवाईक शंकर ढेबे यांनी सांगितले .