जांबसमर्थ येथील मुर्ती चोरीचा तपास लागेना;ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात पुकारला एल्गार
मंगळवार ता.(३०) पासून चूलबंद करून घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा बैठकीत घेतला एकमुखी निर्णय
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम स्वामींच्या देव्हाऱ्यातील श्रीराम,लक्ष्मण,सिता हनूमान,शत्रूघ्नसह अन्य मुर्तीची चोरी होऊन आठवडाभराचा कालावधी लोटला आहे.घटनेला आठवडा होऊनही तपासात काहीच हाती लागत नसल्याने भाविकांत प्रशासना विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान,ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलेला (दि.३०) मंगळवारपासून चूलबंद करत घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर निषेध व्यक्त करून जो पर्यंत आरोपी जेरबंद होत नाहीत तो पर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय आज रविवार ( दि.२८) रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला चारशे ते पाचशे ग्रामस्थ महिला सहभागी झाले होते.यावेळी रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज भूषण महारूद्र स्वामी,अंबादास अंभोरे,यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.सरपंच बाळासाहेब तांगडे,विलास तांगडे,राजकुमार वायदळ,राजेंद्र तांगडे,अक्षय तांगडे,किशोर मुन्नेमाणीक यांच्यासह आदी महिलांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
दरम्यान मंगळवार (दि.३०) रोजी सकाळी सर्व महिला एकत्रित येऊन मंदिरासमोर जपसाधना करतील.तर पुरूषांनी घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले . जो पर्यंत आरोपी जेरबंद होत नाहीत.तो पर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा ठाम पवित्रा जांबसमर्थकर वासियांनी घेतला आहे.
यावेळी ग्रामस्थ,महिला,आबालवृद्ध,जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा.डॉ.भाऊसाहेब देवकर यांनी केले तर शेवटी पसायदानाने बैठकीची सांगता करण्यात आली