मूर्तीवेसप्रकरणी नागरिकांनी घेतली उप विभागीय अधिकाऱ्यांची भेट
जालना । गेल्या वर्षभरापासून मूर्ती वेसचा रस्ता बंद आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी रस्ता सुरु करण्याच्या मागणीसाठी आज गुरुवारी(दि. 22) रोजी उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांची भेट घेतली. शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेला मूर्ती वेसचा रस्ता बंद असल्याने नागरीक, व्यापारी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता येत्या 26 तारखेपर्यंत सुरु करा अन्यथा “जालना बंद”चे आवाहन करणार असल्याचा ईशारा देत या भागातील नागरीकांनी मंगळवारी(दि. 20) रोजी ठिय्या दिला होता. यावेळी नगर परिषदचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, हा रास्ता तात्काळ सुरु करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी गुरुवारी पुन्हा एकदा उप विभागीय अधिकारी संदीपान सानप यांची भेट घेतली. दि. 27 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार असून या बैठकीत मूर्तीवेसचा प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उप विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी महेश दुसाने, बाला परदेशी, धनसिंग सूर्यवंशी, चेतन सुवर्णकार, जगदीश गौड, दुर्गेश कठोठीवाले, दिनेश भगत, वेणूगोपाल झंवर, नरेश खुदभये, शेख जावेद, वसीम अन्सारी आदींसह इतरांची उपस्थिती होती.