घोडेगाव ते डुक्रीपिंप्री बस वेळेवर सुरू करा; अन्यथा रास्ता रोको
जालना (प्रतिनिधी) ः शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी हेळसांड होत असल्यामुळे जालना तालुक्यातील घोडेगाव आणि डुक्रीपिंप्री फाट्यावरून वेळेवर आणि अधिकच्या बसेस सुरू करण्यात याव्यात अशी मागणी मोतीगव्हाणचे सरपंच गणेश मोहिते यांच्यासह परिसरातील शाळकरी मुला-मुलींनी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रण यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना तालुक्यातील घोडेगाव आणि डुक्रीपिंप्री फाट्यावर जालना – शेवली ही एकच बस सुरू असून महाविद्यालयाचा वेळ हा 8.15 वाजेचा असल्यामुळे वेळेवर कॉलेजला पोहचत नाही. तसेच महाविद्यालयात 70 ते 80 विद्यार्थी संख्या असून ऐवढे विद्यार्थी एका बसमध्ये बसणे शक्यच नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने या मागणीचा विचार करून तात्काळ अधिकची बससेवा सुरू करावी नसता सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करू असा ईशारा या निवेदनात देण्यात आला.
निवेदनावर मोतीगव्हाणचे सरपंच गणेश मोहिते यांच्यासह विद्यार्थी अजय पंडित, अमोल हंगरगे, रोहण जाधव, विशाल जाधव सह सर्व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.