बसगाडीत बसायला कुणी, जागा.. देता का हो जागा…?

दिव्यांग प्रवाशांची तुर्त हाक :चालक व वाहकांचे दुर्लक्ष अंबड आगाराप्रमुखांनी लक्ष देण्याची मागणी
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
‘एसटीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास’असे म्हटले जाते.मात्र,याला अंबड आगार अपवाद ठरत आहे.राज्य परीवहन महामंडळाच्या प्रत्येक एसटी बसमध्ये विशेष घटकांतील नागरीकांसाठी आरक्षित राखीव जागा असते.तसे बसगाडीच्या खिडक्यावर देखील नमूद केले आहे.परंतु आरक्षित जागेचा वापर इतरच प्रवाशी करीत असल्याने या राखीव जागा फक्त नावालाच उरल्याचे चित्र दिसून येत आहेत.
दुसरीकडे,राज्य शासनाने जेष्ठ व महिलांसाठी बसमध्ये प्रवासांसाठी तिकिटावर सवलत दिली आहे.त्यामुळे बसस्थानकात बसमध्ये जागा पकडण्यासाठी एकच झुंबड उडत आहेत.दिव्यागांना शारीरिकदृष्ट्या जागा पकडणे शक्य होत नाही.त्यामुळे त्यांना आरक्षित राखीव जागेचा फायदा होत नसल्याने त्यांना बसमध्ये ताटकळत उभा राहूनच खडतर प्रवास करावा लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
तसेच एसटी बसच्या दरवाजावर दिव्यांग प्रवाशांना चढण्यास व उतरण्यास चालक व वाहकांनी मदत करावी अशी सुचना देखील लिहिलेल्या आहेत.मात्र,चालक व वाहक या सुचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना बसमध्ये प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अवहेलना सोसावी लागत आहेत.बसगाडीत बसण्यास दिव्यांग प्रवाशांना जागा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.याकडे आगारप्रमुखांनी लक्ष देऊन चालक व वाहकांना सुचना करावी अशी मागणी प्रहार संघटनेचे घनसावंगी तालुकाध्यक्ष अनिरूद्ध म्हस्के, विकास राठोड, पांडुरंग करपे, रामेश्वर राठोड यांच्यासह आदी दिव्यांग प्रवाशांतून होत आहे.