घनसावंगी तालुक्यात दोन दिवस पाऊस ; पिके पाण्याखाली
कुंभार पिंपळगाव परिसरात पाऊस ; सर्व पिके पाण्याखाली शेतकरी चिंतेत
जालना प्रतिनिधी ;
घनसावंगी तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, वादळी वाऱ्यासह अति पाऊस झाल्याने खरीप पिकांसह ऊसातही पाणी साचले आहे. पाणी लागल्याने उभे कापूस पीक जळू लागले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे सौंदलगाव येथील एका शेतकऱ्याची खोदलेली व बांधकाम झालेली विहीर ढासळली आहे.
मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यामुळे ऊस लागवडीत घट झाली. यावर्षी सोयाबीन, कापूस, तूर, मूग पिकांचे क्षेत्र वाढले. पेरणी झालेल्या खरीप पिकांना रिमझिम पावसामुळे जीवदान मिळाले. परंतु ऑगस्ट महिना अर्धा होऊनही तालुक्यात कोठेच जोरदार पाऊस न पडल्याने खरीप पिकांवर मोठी रोगराई पसरली होती.सोयाबीनवर यलोमोझेंक या विषाणूजन्य व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग चितेत पडला असून, पिके धोक्यात आली होती. पिके पिवळी पडल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. रोगराईला रोखण्यासाठी शेतकरी विविध किटक नाशकाचा वापर करत आहेत. त्यातच ३१ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव राजा टाकळी ,लिंबी, मूर्ती ,गुंज, आरगडे गव्हाण ,पिंपरखेड अंतरवाली टेंभी, धामणगाव, , सिंदखेड ,पाडोळी सह राणी ऊंचेगाव, गुरूपिंप्री, मंगू जळगाव, घनसावंगी, भद्रेगाव, तनवाडी, एकरुखा, भायगव्हाण, दहिगव्हाण, बाचेगाव राहेरा, तीर्थपुरी, खापदेव हिवरा, रुई, भाडर्डी, जोगलादेवी, भनंग जळगाव, एकलहेरा, खालापुरी, खडका, बोडखा, भोगाव, मंगरूळ येथे समाधानकारक पाऊस पडला. यात मुरमा, कंडारी, आंतरवाली टेभी ,
रामसगाव, शेवता, बानेगावच्या काही शिवारात ढगफुटी सदृश पाऊस पडून कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर, आदी पिके पाण्याखाली गेली. तर वादळी वाऱ्यामुळे उसासह इतर पिके आडवी झाली. ओढे-नाले ओसंडून वाहिल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते. या पाण्यामुळे काही ठिकाणी कापसाचे पीक जळू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विहीर कोसळली:
घनसावंगी तालुक्यातील मुरमा, रामसगाव, शेवता, बानेगाव, भोगगाव, लिंगसेवडी, सौंदलगाव शिवारात मुसळधार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकासह ऊसातही पाणी साचले आहे. एवढेच नाही तर सौंदलगाव येथील शेतकरी अमोल अर्जुन कारके यांच्या गट नंबर ८५ मधील सन २०२२ मध्ये खोदलेली व बांधकाम झालेली विहीर ढासळली आहे