आमदारांकडून पत्रकाराला धमकी? अर्वाच्च वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून जाहीर निषेध!

आमदारांकडून पत्रकाराला धमकी? अर्वाच्च वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून जाहीर निषेध!
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथील आश्रमशाळेत अदानी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची बैठक सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सुरेश वाणी यांच्याशी कथितरीत्या अर्वाच्च भाषेत वक्तव्य करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे.
बैठकीदरम्यान पत्रकार सुरेश वाणी यांना उद्देशून, “१५ ऑगस्ट होऊ द्या… माझ्यावर याआधी भरपूर गुन्हे आहेत. वाणी, तुमच्याकडे बघून घेतो,” अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तसेच “पत्रकारांचे धंदे झाले आहेत” अशा प्रकारचे वक्तव्य करून पत्रकारांचा अवमान केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, जनतेचे प्रश्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविणे, वस्तुस्थिती मांडणे आणि प्रश्न विचारणे हे त्याचे घटनात्मक लोकशाहीतील महत्त्वाचे कार्य आहे. त्यामुळे पत्रकारांना धमकावणे किंवा त्यांचा अवमान करणे हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले की, आमदारांना एखाद्या पत्रकाराबद्दल वैयक्तिक राग किंवा नाराजी असेल, तर तो जाहीरपणे व्यक्त करण्याऐवजी पत्रकाराची बाजू आणि वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. पत्रकारांना दमदाटी करणे म्हणजे लोकशाहीचा घात करण्यासारखे आहे. न्यायव्यवस्थेतील व्यक्तींवर अन्याय झाल्यास त्या देखील पत्रकारांकडे आपली बाजू मांडतात आणि न्यायाची अपेक्षा करतात. महाराष्ट्र ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी भूमी असून, किल्ले शिवनेरीचे आमदार शरद सोनवणे यांच्या कथित बेछूट वक्तव्याचा राज्य पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार बांधवांची जाहीर माफी मागून आपले वक्तव्य मागे घेतले नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांना निवेदन देऊन राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही आणि पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी संपूर्ण पत्रकार संघटना ठामपणे उभी राहील, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जालना शाखेकडून देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला असून पत्रकाराच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी सांगितले आहे।


