घनसावंगी तालुका

‘मायेची सावली’तून ११५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार!

दुष्काळी परिस्थितीत गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था; स्कूल बॅग, वह्या, कंपासचे वाटप करून शिक्षणाला दिले बळ

कुंभार पिंपळगाव :

आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने राबविण्यात येणारा ‘मायेची सावली’ हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी दिलासादायी ठरत आहे. या उपक्रमांतर्गत कुंभार पिंपळगाव येथील श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ११५ गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर संस्थेने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत मदतीचा हात दिल्याने पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जी. बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, कंपास यांसह दैनंदिन शैक्षणिक वापरासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च भागविताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, तसेच केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या गुणवत्तेला आणि स्वप्नांना मर्यादा पडू नयेत, हा या उपक्रमामागील संस्थेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. मात्र, हा पाया अधिक मजबूत करण्यासाठी समाजातील शैक्षणिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. ‘मायेची सावली’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेली ही मदत केवळ शैक्षणिक साहित्यापुरती मर्यादित नसून, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणारी आणि शिक्षणाची जिद्द अधिक दृढ करणारी आहे.

या कार्यक्रमाला शालेय समितीचे सदस्य जयप्रकाश राठी, धनंजय देशपांडे, प्राथमिक विभागाचे मानद मुख्याध्यापक निवृत्ती घुमरे, मनोहर तौर तसेच प्रभारी पर्यवेक्षक साईनाथ तानूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे स्थानिक अध्यक्ष अमित देशमुख, संस्थेचे सदस्य राजू भैय्या तौर तसेच शालेय समितीच्या अन्य सदस्यांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशाल पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कैलास भालेराव यांनी मानले.

आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मायेचा आधार देत त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचे काम ‘मायेची सावली’ उपक्रमातून होत आहे. संस्थेचा हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक उत्तरदायित्व आणि संवेदनशीलतेचा आदर्श ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!